Zero Residue Rasayanik Awasheshmukta Sheti Tantradnyan
अवशेषमुक्त शेती पद्धती ही मानवी आरोग्य, पर्यावरण व जैवविविधता यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. लेखकाने अवशेषमुक्त म्हणजेच 'झिरो रेसिड्यू'ची वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.
अवशेष पातळी, लेबल क्लेम, उत्तम शेतीपद्धती, कृषी रसायनांचा सुरक्षित आणि सुयोग्य वापर, अवशेष पातळीबद्दल सतर्कता आणि जागरुकता, अशी काही महत्त्वपूर्ण मानके तसेच कमाल सेंद्रिय शेतीसाठी जैविक निविष्ठा घटकांबद्दल अतिशय सविस्तर, शास्त्रोक्त माहिती यामध्ये उपलब्ध करून दिली आहे.
लेखकाने सेंद्रिय शेती आणि अवशेषमुक्त शेतमालाच्या उत्पादनाच्या अनुषंगाने विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा घेतलेला आधार ही पुस्तकाची जमेची बाजू आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वैज्ञानिक पद्धतीने केल्यास पिकांचे उत्पादन व प्रत हे शाश्वत स्वरूपात मिळवून शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध आणि जगाचा पोशिंदा नव्हे तर आरोग्याचा दूत देखील होऊ शकतो; हे यामध्ये सप्रमाण मांडले आहे.
प्रगतीशील व निर्यातक्षम शेतमाल उत्पादक शेतकरी, निर्यातदार, आरोग्याप्रती सजग ग्राहक तसेच कृषीशी संबंधित अधिकारी यांना धोरण निश्चितीसाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
लेखकाविषयी माहिती : डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी बीएससी (अॅग्री), एमएससी (बायोटेक्नॉलॉजी), एमबीए (अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट अँड इंटर नॅशनल ट्रेंड) तसेच पीएचडी (नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन अँड इट्स नॅशनल स्टँडर्ड) विषयात प्राप्त केली आहे. डॉ. नाईकवाडी राष्ट्रीय अध्यक्ष, रेसिड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन (रोमिफ इंडिया), पुणे, वरिष्ठ सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकारी, 'नोका' (अपेडा मान्यताप्राप्त संस्था), पुणे, आंतराष्ट्रीय सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकारी, बायोअॅग्रिसर्ट युरोपीय प्रमाणीकरण संस्था, बोलोग्ना, इटली आणि तज्ज्ञ संचालक, महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (मोर्फा) म्हणून कार्यरत आहेत. त्यांची रासायनिक अवशेषमुक्त शेती यावर आधारित चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सेंद्रिय शेती व प्रमाणीकरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध स्तरावरील मानाचे २३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.