Zapoorza by Achyut Godbole झपूर्झा अच्युत गोडबोले
Zapoorza by Achyut Godbole झपूर्झा अच्युत गोडबोले
आयुष्यातले अनुभव जितके समृद्ध आणि खोलवर, तितके ते साहित्यातही सच्चेपणानं उतरतात.
डोस्टोव्हस्कीसारखे लेखक मृत्यूच्या जबड्यातून शेवटच्या क्षणाला बाहेर आले होते.
काफ्का, कामू, सार्त्र, हेमिंग्वे, स्टाईनबेख, डिकन्स, लॉरेन्स आणि अशा अनेकांची स्वतःची आयुष्यं प्रचंड वादळी होती.
त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचं साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटत होतं.
शेक्सपिअर एका खाणावळीत बसून तिथे येणाऱ्या अनेक लोकांच्या आयुष्याचा, सुख-दुःखाचा अभ्यास करत असे. डिकन्सनं रात्री रात्री भटकून लंडनमधल्या गरीब कामगारवस्त्यांमधले अनुभव टिपले, तसंच चेकॉव्हनंही केलं.
एकूण ही सगळी मंडळी स्वतःही विलक्षण भन्नाट आयुष्यं जगली आणि त्याचबरोबर त्यांनी इतरांच्या आयुष्याचा, तसंच समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांतून आणि प्रदेशांतून येणाऱ्या असंख्य लोकांच्या आयुष्याचाही अभ्यास केला, त्यामुळेच त्यांचं साहित्य श्रीमंत, रसरशीत आणि ताजंतवानं झालं.
कुठल्याही कलेवर सामाजिक, भौतिक परिस्थिती आणि त्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि कौटुंबिक अनुभव हे दोन्ही परिणाम करत असतात; पण इब्सेन, डोस्टोव्हस्की, डिकन्स अशा काहींच्या बाबतीत त्यांच्या वादळी आयुष्याचा त्यांच्या लिखाणावर खूपच खोलवर परिणाम झालेला मला दिसला म्हणूनच ‘झपूर्झा’मध्ये अनेक लेखकांची आयुष्यं मी सविस्तरपणे रंगवली आहेत.
त्यांची झंझावाती आयुष्यं एखाद्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टीसारखी वाचताना तर वाचकांना मजा येईलच, तसंच अंगावर कित्येकदा काटाही येईल, अशी मला आशा आहे.
तसंच या साहित्यिकांच्या आयुष्यातल्या अनुभवांचा त्यांच्या लिखाणावर परिणाम कसा झाला हे समजणं खूपच उद्बोधक ठरेल.
त्याचबरोबर लेखकांच्या साहित्यावर आजूबाजूच्या परिस्थितीचाही खूपच मोठा परिणाम होतो आणि म्हणूनच अनेक लेखकांच्या वेळची आजूबाजूची परिस्थिती काय होती हेही ‘झपूर्झा’मध्ये थोडक्यात दिलंय.
या पुस्तकात या सगळ्या लेखकांची आयुष्यं विस्तारानं आली आहेत, तसंच त्यांच्या भोवतालची सामाजिक परिस्थितीही थोडक्यात रंगवली आहे आणि त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृतीचा थोडक्यात गोषवारा सांगितला आहे.