Vishnujinchi Khasiyat Non-Vegetarian विष्णूजींची खासियत मांसाहारी विष्णू मनोहर Vishnu Manohar
Vishnujinchi Khasiyat Non-Vegetarian विष्णूजींची खासियत मांसाहारी विष्णू मनोहर Vishnu Manohar
आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत् पशुभिर्नराणाम् ।
असे एक संस्कृत सुभाषित आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चारही गोष्टी मनुष्य आणि पशू यांच्यामध्ये समान आहेत; पण चार नैसर्गिक बाबींमध्ये आहाराचा प्रथम क्रमांक आहे. प्रायोपवेशन करणारे निग्रही लोक सोडले तर पोटाची भूक कोणालाही टाळता आली नाही. भूक भागविण्यासाठी खाद्यपदार्थांशिवाय काहीही लागत नाही; पण आस्वादाचा आनंद घेण्यासाठी माणसाने भोजनप्रक्रियेत कलाबूत शोधून काढली !
खाण्यासाठी जगण्यातील जे सौंदर्य आहे ते अवगत होण्यासाठी व आत्मसात करण्यासाठी प्राचीन काळामधील विराटपर्वातील भीम ऊर्फ बल्लवाचार्य यांच्यासारखे, तर अर्वाचीन काळातही पाककलाप्रवीण असे मोजके अन्नदाते आहेत. त्यात संजीव कपूर व विष्णू मनोहर यांची नावं आघाडीवर आहेत. आकाशवाणीवरून ते गृहिणींना सुगरण होण्याचे प्रशिक्षण देतातच; पण स्वतः सुद्धा वेगवेगळ्या खाद्यांवर प्रयोग करून नव्या लज्जतदार पदार्थांची भर आहारात घालत असतात.
विष्णू मनोहर याने या विषयावर ई-टीव्हीवर मेजवानी या सदरात पाककौशल्याचे गृहपाठ लोकप्रिय केले आहेत. त्यात अनेक जुन्या-नव्या खाद्यपदार्थांचे प्रयोगशील पाचशे भाग आतापर्यंत झाले आहेत. इतकेच नव्हे, तर आतापर्यंत ४५ पुस्तकेही त्या विषयांवर प्रकाशित झाली आहेत. प्रस्तुत 'विष्णूजींची खासियत' या पुस्तकात अनेक खाद्यपदार्थांचा स्वादगंध एकत्रित केला आहे. रुचकर पदार्थांसाठी काही लज्जतदार घटकच वापरले पाहिजेत असे नाही, तर प्रत्येक वस्तूला स्वतःची अशी एक चव असते हे न विसरता नवरसपूरक अशा त्या सर्व चवींचा मेळ घालून एक नवाच मिश्र पदार्थ तयार करता येतो. हे जो ओळखतो तोच चवदार पदार्थांच्या रुचीद्वारे अन्नपूर्णेचे यशस्वी आराधन करू शकतो. विष्णू मनोहर हा त्याच पायवाटेवरचा एक दमदार पथिक आहे.