Payal Books
Vinda: Vinda Karandikar Yanchi Samagra Kavita विंदा : विंदा करंदीकर यांची समग्र कविता – विंदा करंदीकर
Couldn't load pickup availability
पूर आलेल्या नदीचा प्रवाह काठ जुमानीत नाही. अगदी अशाच प्रकारचे रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या प्रकृतीमुळेच करंदीकरांनी आपल्या डोळ्यांसमोर काव्याच्या स्वरूपाविषयीचा कसलाही साचा कधीच ठेवलेला नाही. करंदीकरांची कविता जीवनाला मन:पूर्वकतेने सामोरी जाताना दिसते. तिला जीवनातल्या नाना प्रकारच्या अनुभवांचे आवाहन पोहोचते. हे आवाहन भाषेची, घाटाची आव्हाने निडरपणे झेलीत व्यक्त होत राहते. जीवनाला मनमोकळेपणाने सामोरे जाण्याची ही प्रवृत्ती नवकवितेच्या कालखंडातील एक अत्यंत महत्त्वाची आणि निरोगी अशी प्रेरणा आहे.
करंदीकरांची खरी बंडखोरी त्यांच्या या मनमोकळ्या कलात्मक प्रतिष्ठेचे साचे झुगारू शकणाऱ्या स्वीकारशीलतेत आहे. मराठी कवितेच्या खऱ्या विकासाची दिशा या मोकळ्या, निरोगी प्रकृतीत आहे. उद्याची मराठी कविता संपन्नतेच्या नव्या दिशा शोधणार आहे ती जीवनाला मोकळपणाने सामोरे जाण्याच्या याच प्रवृत्तीतून नकली धूसरतेचे आणि नटव्या आकृतिवादाचे स्तोम माजवण्यातून नव्हे, किंवा पद्यबद्ध राजकीय विचारसरणीतून नव्हे. कवितेच्या कलात्मक आकृतीचे मोल तिच्या आशयाच्या संपन्नतेवर, सखोलतेवर, जीवनाचे दर्शन घडवण्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असते त्याच्याशी एकरूप असते. करंदीकरांची कविता वाचीत असताना त्यांचे हे सामर्थ्य सतत जाणवत राहते.
– मंगेश पाडगांवकर – (संहिताच्या प्रस्तावनेतून)
