Vidrohi Tukaram विद्रोही तुकाराम by A H SALUNKHE
तुकारामांच्या बहुतेक चरित्रकारांनी आपल्यापुढे उभी केलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तित्वाशी सुसंगत नाही, असे मला सतत वाटत आले आहे. तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असहाय होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहारशून्य, भोळाभाबडा, किंबहुना भोळसट संत, असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की येथील समाजमनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणा-या धर्मसत्तेला कडवे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता. अंतरंगाने किडक्या, परंतु बहिरंगाने अत्यंत प्रबळ व मजबूत असलेल्या एका समाजव्यवस्थेच्या मुळाशी निर्भयपणे सुरूंग लावण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. एका अनैतिक व्यवस्थेविरुद्ध प्रचंड विद्रोह केला. अशा बहादूर व्यक्तीला एका भोळसट व असहाय व्यक्तित्वाच्या स्वरूपात रेखाटणे म्हणजे एखाद्या सिंहाचे चित्र शेळीच्या स्वरूपात काढणे, किंवा एखाद्या धगधगत्या निखान्याचे वर्णन थंडगार कोळसा म्हणून करणे होय. हे उघडउघड विकृतीकरण आहे.आणि तुकारामांविषयी लिहिणा-या बहुसंख्य लेखकांनी अशा प्रकारचे विकृतीकरण केले आहे, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. म्हणूनच तुकारामांचे मूळ व्यक्तित्व नेमकेपणाने समजावून घेण्यासाठी नव्याने अनेक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात असे काही प्रयत्न होऊ लागले आहेत, ही समाधानाची बाब. माझा हा प्रयत्नही त्यांपैकीच एक होय.
-- आ. ह. साळुंखे