अरण्योपनिषद - दुसरे संचयवृत्तीचा परित्याग करून निःसंग होणे म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणे. डॉ.गणेश देवी यांनी बडोद्याजवळील तेजगड या आदिवासी पाड्यामध्ये आपल्या वानप्रस्थाश्रमाला प्रारंभ केला. आदिवासींच्या अस्मितेचा विकास साधणे हे आता डॉ.देवींचे आयुष्य झाले आहे. या आपल्या जगण्याला त्यांनी तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, साहित्य यांच्या साह्याने पैलूदार केले आहे. त्यांच्या या आर्ष आणि विदग्ध व्यक्तित्वाचे दर्शन 'वानप्रस्थ' या लेखसंग्रहात घडते; एकाच वेळी एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विचारवंत व आपला एक जवळचा मित्र आपल्याशी बोलतोय अशी प्रतीती वाचकास येते; संशोधन आणि सृजन यांचे अनोखे रसायन वाचकास पुलकित करते - मग लेखाचा विषय पोटभाषा असो, गुजरात-दंगल असो, जंगलतोड असो वा हिंसेचा स्वप्नशोध असो. 'अरण्य' हा परिसरविशेष नाही; स्वातंत्र्य, सहिष्णुता, अहिंसा या मूल्यांचा तो आदिबंध आहे - जरी आज तो उपेक्षा, वेदना आणि शोषण यांचे प्रतीक झाला असला तरी