vachatana-pahatna-jagatana-nanda-khare वाचताना पाहताना जगताना - नंदा खरे
नंदा खरेंचे उपजीविकेचे साधन / पेशा सिव्हिल इंजिनियरचा असला तरी त्यांचे
राजकारण, समाजकारण, सांस्कृतिककारण
आणि साहित्यव्यवहार यांतले हस्तक्षेप आणि सहभाग मला
विशेष महत्त्वाचे वाटतात. साधारणत: आपल्या विशिष्ट
अभ्यासविषयाच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यासविषय
समग्र जगण्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येणे ही मला
त्यांच्याबाबतीतली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट वाटते. त्याचा
परिणाम त्यांच्या आत्ता प्रकाशित होत असलेल्या या लेखनातून
खूप तपशिलाने पाहता येईल. एकारलेल्या शहाणपणापेक्षा
जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श करत त्यातले परस्परसंबंध
तपासणारे त्यांचे 'कुतूहलमिश्रित भान' मला महत्त्वाचे वाटत
आले आहे. खरे तर त्यांचे असे बहुअंगांना स्पर्शणारे व्यक्तिमत्त्व
असल्यामुळेच 'अंताजीची बखर' पासून ललित लेखनातला
त्यांचा अन्य प्रवास हा खूपसमृद्ध झाला आहे.
त्यांच्या या लेखनात काही जागा माझ्या स्वत:च्या भूमिकेला
छेद देताहेत असेही वाटले. पण त्यांच्या भूमिकेच्या
गांभीर्याविषयी, शोषित आणि तळागाळातील माणसांप्रती
असलेल्या आस्थेविषयी मलाखात्री आहे.
-सतीश काळसेकर