Va !' Mhanatana... By Dr. Ashutosh Javadekar
‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’
– डॉ. आशुतोष जावडेकर
साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…