Tujasathi Maran Te Janan by Anil Nene तुजसाठी मरण ते जनन अनिल नेने
Tujasathi Maran Te Janan by Anil Nene तुजसाठी मरण ते जनन अनिल नेने
ज्या क्रांतिवीरांनी देशमुक्ततेसाठी आपले रक्त-घाम व अश्रू सांडले, त्यांचा इतिहासच आजच्या पिढीला शिकवला व सांगितला जात नाही. वर्तमानात आदर्श नाहीत व इतिहासात खरे आदर्श शिकायला मिळत नाहीत, अशा विचित्र अवस्थेत आजची युवा पिढी सापडली आहे. अशा वेळी कित्येकांना चित्रपट तारे-तारका व क्रिकेटपटूच आदर्श वाटू लागले, तर त्यात नवल काय? मात्र अशा बेगडी आदर्शांमुळे राष्ट्र घडू शकत नाही, देश बलवान होऊ शकत नाही- हे त्यांच्यापर्यंत पोचायला हवे. अन्यथा, स्वराज्यप्राप्तीनंतरच्या इतक्या वर्षांत वाढती बेकारी, दंगली, जातीय द्वेष, बलात्कार, खून, मारामाऱ्या आणि सुस्त प्रशासन हेच चित्र सतत दिसत राहणार. यातून राष्ट्राभिमानी माणूस घडवायचा असेल, तर राष्ट्रयोग्यांची चरित्रे वाचली-अभ्यासली जायला हवीत, तरच तरणोपाय आहे.
लंडनस्थित मित्रवर्य अनिल नेने यांनी या विषयावर लिहिणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्वित्झर्लंडमधील बृहन्महाराष्ट्र मंडळ या संस्थेने त्यांची ऑनलाइन व्याख्याने आयोजित केली होती. ती व्याख्याने आता पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत याचा संतोष वाटतो. अनिल नेने हे अजब व्यक्तिमत्त्व आहे. भटकंती, खादंती आणि या सर्वांवर लेखन करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. प्राध्यापकाची नोकरी करूनही त्यांचे लेखन कुठेही जडजंबाल वा रुक्ष होत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अनेक दशके लंडनमध्ये वास्तव्य करूनही या माणसाने आपला मराठी बाणा (की पुणेरी?) टिकवून ठेवला आहे. जागतिक राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास यातच नव्हे तर आज भारतात घडणाऱ्या राजकीय घडामोडींतही त्यांना रुची आहे, हे विशेष!