Trikal त्रिकाल by P M SHINDE
वाङ्मय हा व्रतस्थांचा व्यवहार असतो. सगळे त्याच वाटेेनं निघालेले असतात. माणसानं माणूस समजून घेणं हाच आयुष्याचा इत्यर्थ असतो. त्यातूनच अंतःकरणाला वाचा फुटते, त्या ध्वनीचा शब्द घडवणं हीच निर्मितीची प्रक्रिया, प्रतिज्ञाही असते.
साहित्यातला शब्दरूप उद्गार कोणत्याही दिशेतून येऊ शकतो. तो रस्त्यातून उमटू शकतो, तो शेतातून मुखर होऊ शकतो, तो जंगलातून जागू शकतो, तो कारखान्यातून प्रगट होऊ शकतो, तो अभावातून अवतरू शकतो, तो आनंदातून ओसंडू शकतो, तो पुष्पदलातून दरवळू शकतो, तो दलदलीतून दणाणू शकतो, तो व्यवहारातून व्यंग पाऊ शकतो, तो व्यवस्थेतून विद्रोहानं व्यथांकित होऊ शकतो; नाना वाटांनी, नाना पावलांनी, नाना तऱ्हांनी तो उद्गार स्वत:चे ठसे ठेवत साहित्याची मोहोर बनून जातो.
साहित्य सर्वगामी राहत आलं आहे. प्रत्येक खळाळ खरेपणा घेऊन वाहू लागला की तो तो प्रवाह प्रगल्भ होऊन जातो; त्याचं वेगळेपण, त्याची पृथगात्मकता पुरेशी परिपक्व झालेली असते, प्रौढ झालेली असते!