राससुंदरी, विनोदिनी व बीना या तिघींचाही बंदिवास वेगवेगळा,
पण त्यातही झुंज देत वाटचाल करण्याची जिद्द चिवट.
राससुंदरीला कौटुंबिक मर्यादांचा व रूढिग्रस्ततेचा बंदिवास.
विनोदिनीच्या वाट्याला आलेला बंदिवास हा वारांगनावृत्तीचा
बंदिवास होता. तिला विवाहित जीवनातली प्रतिष्ठा व सुरक्षितता
हवी होती, पण वेश्येला या गोष्टी दुर्मिळ होऊन जातात. त्यांच्याभोवती पुरुषशासित समाजाच्या विषयलोलुपतेचा जो वेढा पडतो त्यातून जन्मजन्मांतरी सुटका नसते. स्वत:चे आयुष्य तर जातेच पण मुलाबाळांचे आयुष्यही शापित होऊन जाते. वरवर पाहता मुक्त व बंधनहीन वाटणारे वारांगनांचे जीवन आतून बंदिस्त असते.
बीना दास हिच्या वाट्याला आलेला बंदिवास तर अगदी सरळ डोळ्यांना दिसणारा. पण तो कशासाठी? देशाला स्वातंत्र्य
मिळावे म्हणून घेतलेल्या ध्यासापोटी. तुरुंगातला बंदिवास परवडला, पण संपूर्ण देशाला बाहेरून ज्या साम्राज्यवादी सत्तेने घेरले होते व आतून कर्मठपणा, रूढिग्रस्ततांनी व
बुरसटलेपणाने कोंडून ठेवले होते, त्यातून अंतर्बाह्य मुक्ती
मिळणार कशी, ही बीनाची तळमळ होती. एकूण तिघींच्याही अंतर्मनातला प्रश्न एकच ‘का जिवास बंदिवास?’
उत्कटतेने स्त्रीजिवनाचं दर्शन घडविणार्या ह्या तीन आत्मकथा केवळ अंतर्मुख किंवा भावनावश करत नाहीत, तर
अस्वस्थही करतात.
तीन वेगवेगळ्या काळातील, भिन्न पार्श्वभूमी असलेल्या तीन वंगकन्यांची ही आत्मचरित्रे स्त्रीसाहित्याचा व जीवनाचा अभ्यास करणार्यांनाही उपयुक्त आहेत.