tadaa By Ganesh Matkari तडा गणेश मतकरी
tadaa By Ganesh Matkari तडा गणेश मतकरी
समाजाच्या सर्व स्तरांतून कथा लिहिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, महानगरी जाणिवेचे जे मोजके लेखक लिहीत आहेत त्यामध्ये गणेश मतकरी आघाडीवर आहेत, हे आठ कथा असलेल्या त्यांच्या ह्या संग्रहाने अधिकच ठळकपणे दाखवून दिलं आहे.
भूतकाळाची वर्तमानावरली छाया प्रतिबिंबित करणाऱ्या ह्या संग्रहातील बहुतेक कथांमधील निवेदन प्रथमपुरुषी आहे, ज्यातील सीक्रेट ह्या कथेमध्ये असलेली सात प्रथमपुरुषी निवेदनं त्यांची कथालेखनावर असलेली हुकूमत दाखवून देतात. प्रथमपुरुषी निवेदनामध्ये मुख्य पात्राचे बारीकसारीक मनोव्यापार विश्वासार्ह वाटावेत असे टिपता येतात, जे घटितांचा पैस आटोपशीर असलेल्या आणि बव्हंशाने मानसिक पातळीवर घडत असलेल्या ह्या कथांसाठी महत्त्वाचं आहे. परिणामी ह्या कथा दीर्घकथेचा फील देतात. मतकरींना नाट्य म्हणजे काय ह्याची नेमकी जाणीव आहे. तसेच न केवळ भारतीय वर जागतिक चित्रपटांचा व्यासंग असल्यामुळे बारीकसारीक तपशील कॅमेऱ्याऱ्यांच्या नजरेने नोंदवायची हातोटी त्यांनी कमावलेली आहे, हे त्यांच्या कथांमध्ये ठळकपणे दिसते. त्यांच्या कथांमधील भाषिक सरमिसळही तिचं समकालीन असणं अधोरेखित करते. मराठीतील ठेवणीतले शब्द तर ते नेमकेपणे वापरतातच, परंतु इंग्रजी शब्द बेमालूमपणे वापरण्यावरही त्यांचं प्रभुत्व आहे. एकुणातच, समकालीन वातावरण टिपणाऱ्या ह्या कथा, मतकरींची कथनतंत्रावर उत्तम पकड असल्यामुळे वाचनीय तर आहेतच, पण न केवळ महानगरी तर नव्याने लिहिणाऱ्यांसाठी एक रोल मॉडेल ठराव्यात एवढ्या लक्षणीयही आहेत.
-सतीश तांबे