Swaramayee by prabha atre स्वरमयी डॉ. प्रभा अत्रे
Swaramayee by prabha atre स्वरमयी डॉ. प्रभा अत्रे
रसिकांच्या आणि वाचकांच्या प्रेमामुळं ‘स्वरमयी’ची पाचवी सुधारित आवृत्ती प्रकाशित होत आहे. ‘स्वरमयी’मध्ये सुप्रसिद्ध गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी वेळोवेळी लिहिलेले संगीतविषयक लेख एकत्र केले आहेत. स्वतःच्या संगीत साधनेचे आणि गुरूंनी दिलेल्या तालमीचे तल्लीनतेने केलेले चित्रण, गुरुसमान भेटलेल्या व्यक्ती, शिक्षणात संगीताचं स्थान, एक व्यक्ती एक कलाकार म्हणून मैफिलीबाहेर अनुभवलेलं जग, अशा अनेक विषयांचं निवेदन या पुस्तकात आहे.
बी.एससी., एल.एल.बी., संगीतात डॉक्टरेट, आकाशवाणीमध्ये संगीत उपनिर्माती, मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख, परदेशात मैफिली, प्रात्यक्षिकासह व्याख्यानं, कार्यशाळा, विद्यापीठांतून शिकवणं अशा अनेक गोष्टींमुळे डॉ. प्रभा अत्रे यांचे सांगीतिक विचार केवळ समृद्धच झाले नाहीत तर या विचारांना वर्तमानकाळाचे संदर्भही लागलेले आहेत.
संगीत कलेतील सौंदर्याबद्दलची उपजत संवेदनक्षमता, आपले विचार सोप्या शब्दांत, रेखीवपणे अभिव्यक्त करण्याइतकी भाषेवरची पकड यांमुळे डॉ. प्रभा अत्रे यांचे लेखन प्रभावी, आकर्षक आणि नेमके झाले आहे. या क्षेत्रात मिळवलेल्या चौफेर अनुभवांमुळे आणि सूक्ष्म निरीक्षणांमुळं त्यांच्या लेखनाला खोली प्राप्त झाली आहे.
वैश्विक पातळीवर एक ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका, चिंतनकार, संशोधक, शिक्षण तज्ञ, सुधारक, वाग्गेयकार, लेखिका, कवयित्री आणि गुरू म्हणून डॉ. प्रभा अत्रे यांना संगीत जगतात वेगळं स्थान मिळालं आहे. भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘टागोर अकादमी रत्न’ अशा राष्ट्रीय तसेच वेगवेगळ्या राज्य स्तरावरच्या पुरस्कारांनी त्यांच्या संगीत विषयक कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला आहे.