Suswaraalee By Prabha Atre सुस्वराली डॉ. प्रभा अत्रे
Suswaraalee By Prabha Atre सुस्वराली डॉ. प्रभा अत्रे
रसिकांच्या आणि वाचकांच्या प्रेमामुळं ‘सुस्वराली’ची चौथी सुधारित आवृत्ती प्रकाशित होत आहे. ‘सुस्वराली’मध्ये सुप्रसिद्ध गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी वेळोवेळी लिहिलेले संगीत शास्त्र विषयक लेख एकत्र केले आहेत. संगीत निर्मिती, संगीताचं आकलन, संगीत समीक्षा, मैफिलीची रचनातत्त्वे, संगीत शिक्षणाच्या समस्या, संगीत कलेच्या संवर्धनाबाबत राष्ट्रीय धोरण, अशा अनेक विषयांचं विवेचन या पुस्तकात आढळेल.
बी.एससी., एल.एल.बी., संगीतात डॉक्टरेट, आकाशवाणीमध्ये संगीत उपनिर्माती, मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख, परदेशात मैफिली, प्रात्यक्षिकासह व्याख्यानं, कार्यशाळा, विद्यापीठांतून शिकवणं अशा अनेक गोष्टींमुळे डॉ. प्रभा अत्रे यांचे सांगीतिक विचार केवळ समृद्धच झाले नाहीत तर या विचारांना वर्तमानकाळाचे संदर्भही लाभलेले आहेत.
संगीत कलेतील सौंदर्याबद्दलची उपजत संवेदन क्षमता, आपले विचार सोप्या शब्दात, रेखीवपणे अभिव्यक्त करण्याइतकी भाषेवरची पकड यामुळे डॉ. प्रभा अत्रे यांचे लेखन प्रभावी, आकर्षक आणि नेमके झाले आहे. या क्षेत्रात मिळवलेल्या चौफेर अनुभवांमुळं आणि सूक्ष्म निरीक्षणांमुळं त्यांच्या लेखनाला खोली प्राप्त झाली आहे.
वैश्विक पातळीवर एक ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका, चिंतनकार, संशोधक, शिक्षण तज्ञ, सुधारक, वाग्गेयकार, लेखिका, कवयित्री आणि गुरू म्हणून डॉ. प्रभा अत्रे यांना संगीत जगतात वेगळं स्थान मिळालं आहे. भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘टागोर अकादमी रत्न’ अशा राष्ट्रीय तसेच वेगवेगळ्या राज्य स्तरावरच्या पुरस्कारांनी त्यांच्या संगीत विषयक कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला आहे.
मराठी वाङमयात स्वतः कलावंतानं कलेबद्दलचे विचार आणि अनुभव चित्रित केलेली पुस्तकं एकंदरीत कमीच आढळतात; त्यामुळे ‘सुस्वराली’ला एक वेगळं महत्त्व आणि स्थान प्राप्त झालं आहे. डॉ. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी’ या पाहिल्या पुस्तकाला १९८९मध्ये ‘महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार’ मिळालेला आहे.