SHIKSHANKONDI BY TEEM ASHA
साखर उद्योग ही महाराष्ट्रातली महत्त्वाची सहकारी चळवळ. आज महाराष्ट्रात जवळपास २०० साखर कारखाने आहेत. साधारणपणे १५ जिल्ह्यांतून ऊसतोडणी कामगार स्थलांतर करून कुटुंबकबिल्यासह या कारखान्यांमध्ये कामाला येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शालेय प्रवाहात आणण्याचं काम टाटा ट्रस्टतर्फे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्यामध्ये राबवलं जात आहे.
आतापर्यंत ६ ते १४ वयोगटातील २६४८ मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यातील १८२८ मुलांना शाळेतही दाखल करण्यात आलं आहे. स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करत या शिक्षणकोंडीवर तोडगा काढण्यात ‘टीम आशा’ला यश येत आहे. हे काम करत असताना ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांना अनेक बोलके अनुभव आले.
खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये आई-वडलांच्या मदतीसाठी कामाला जुंपून घेणारी लहानगी पोरं या कार्यकर्त्यांना भेटली… शाळेचा गणवेश, दप्तर, डबा घेऊन शिकायला जावं असं स्वप्नं बघणारी पोरं भेटली… कोणत्याही अडचणीवर मात करून पोरांना शाळेत पोचवणारे त्यांचे पालकही भेटले…
अशाच सगळ्या जिवंत, सळसळत्या अनुभवांचा हा कोलाज म्हणजेच ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांची ही बोलकी डायरी… अर्थात शिक्षणकोंडी !