Shantiyog By Geeta Iyengar
योग’ हा विषय तसा अवघडच. कारण ते एक दार्शनिक तत्त्वज्ञान आहे. यामध्ये बुद्धीला पटलेले तत्त्वज्ञान स्वअनुभवानेच सिद्ध करायचे असते. प्रयोग करायचा असतो तो स्वत:वरच; तेही आत्मज्ञानासाठी, मुक्तीसाठी...हे सर्व साध्य करणे कठीण वाटत असले तरी तशी भीती मनात बाळगण्याचे कारण नाही.
योगामुळे जीवन जगण्या-अनुभवण्याची कला अवगत होऊ शकते तसेच जीवनविषयक तत्त्वज्ञानाची ओळख होऊ शकते. म्हणूनच असा व्यापक आवाका असलेला `योग’ दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतोय; परंतु प्रत्यक्षात हे साधायचे कसे याविषयी गुरुजींनी (योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार) सोप्या शब्दांत मांडणी करून ठेवली आहे. त्याचेच विवेचन गीता अय्यंगार यांनी या पुस्तकात समर्थपणे केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने योग हा विषय जीवनप्रवाहासारखा प्रवाहित करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे; अवघड विषय सोपा करून सांगितला आहे, त्याचप्रमाणे योगसाधनेतील अडचणी लक्षात घेत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सामान्यजनांना योगशास्त्र समजेल आणि त्यांना ते अनुभवताही येईल अशी शाश्वती या पुस्तकातून मिळते.
या पुस्तकाचे वाचन, मनन व चिंतन करून सर्व योगसाधकांना निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल.