डॉ. शंकरराव खरात यांनी मराठीत विविध वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांचे ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्रही मराठीतील महत्त्वाचे आत्मचरित्र मानले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कारातून घडलेल्या शंकररावांनी दलित, शोषित, भटक्या-विमुक्तांच्या जीवनाला आपल्या साहित्यात स्थान दिले. ह्या वंचित समाजाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लिहिलेल्या कथा ह्या समाजशास्त्रीय अभ्यासासाठीही महत्त्वाच्या आहेत.
डॉ. खरातांच्या कथांमधून उपेक्षितांचे जीवन, स्त्री-जीवन तसेच विद्रोह व्यक्त होताना दिसतो. खरातांची कथा सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण बनलेली असल्यामुळे मराठी साहित्यात तिचे उत्तम स्वागतच झाले.
डॉ. संदीप सांगळे यांनी शंकरराव खरातांच्या कथालेखनाचा चहुबाजूने अभ्यास करून त्यांची मौलिकता स्पष्ट केली आहे, त्यांच्या कथालेखनांमागील प्रेरणांचा त्यांनी धांडोळा घेतला आहे. भटक्या व गुन्हेगार जातींना डॉ. खरातांनी आपल्या कथांच्या केंद्रस्थानी आणून त्यांची कैफियत कशी मांडली, याचेही विवेचन केले.
‘कथा’ ह्या महत्त्वाच्या वाङ्मयप्रकारात डॉ. खरातांची कथा ही दलित साहित्यातच नव्हे, तर एकूण सर्व साहित्यप्रवाहांत अतिशय महत्त्वाची आहे. समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांनाही ह्या कथा प्रेरक ठरतील, यात शंका नाही.