जे. कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांना पाठविलेल्या पत्रांचे हे संकलन आहे. ‘कृष्णमूर्ती ह्या पत्रांमधून - निव्वळ पदवीलाच महत्त्व न देता
विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास साधून त्यांना मानवी जीवनाची
मौलिकता आणि प्रतिष्ठा ह्या गोष्टींची जाणीव करून देणे,
केवळ ऐहिक प्रगतीवरच लक्ष केंद्रित न करता त्यापेक्षा
महत्त्वाच्या गोष्टींचा वेध घेण्यासाठी आणि वैश्विक समाजाच्या
निर्मितीसाठी त्यांना तयार करणे ह्या बाबतीत शिक्षणपद्धतीला
आलेल्या अपयशाकडे आपले लक्ष वेधतात. ही पत्रे वाचताना पालक, शिक्षक, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आणि शिक्षणाविषयी आस्था वाटणार्या अन्य व्यक्तींच्याही जाणिवा समृद्ध होतील.
ह्या युगातील एक थोर विचारवंत आणि आध्यात्मिक द्रष्टा म्हणून
जे. कृष्णमूर्ती (1885-1986) ह्यांची जगभर ख्याती आहे.
सर्व मानव समाजाविषयी त्यांना प्रगाढ आस्था होती.
सतत सहा दशकांहूनही अधिक काळ जे. कृष्णमूर्तींनी जगभरातील
विविध देशांमधील लोकांपुढे भाषणे दिली, गटचर्चा केल्या;
कुठल्याही अधिकारवृत्तीने नव्हे, तर एक मित्र, एक सत्यप्रेमी
ह्या नात्याने ते आपले जीवनकार्य करत राहिले.
त्यांची शिकवण ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आणि सिद्धांतावर
आधारित नाही; आणि म्हणूनच जगातील सद्य:कालीन आणीबाणीच्या परिस्थितीच्या संदर्भातील प्रश्नांची, तसेच मानवी अस्तित्वाशी निगडित चिरंतन प्रश्नांची उत्तरे ज्या व्यक्ती शोधत असतात, त्यांच्याशी
कृष्णमूर्ती ह्या जीवनविषयक भाष्यातून थेट संवाद साधतात.