Senapati Dhanaji Jadhav by Pra Dr Uttam Hanvate सेनापती धनाजी जाधव उत्तम हनवते
सेनापती धनाजी जाधव
महाराष्ट्राच्या इतिहासात मोगलांविरुद्ध मराठ्यांचे जे 'स्वातंत्र्ययुद्ध' झाले त्याला अनन्यसाधारण स्थान आहे. औरंगजेबाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी मराठ्यांनी अनेक आपत्ती सोसून आणि आपलं जीवन महाराष्ट्राला अर्पण करून ते स्वातंत्र्ययुद्ध जिंकलं. म्हणूनच राज्य सुरक्षित राहिलं आणि पुढच्या शतकात हिंदुस्थानभर वृद्धिंगतही झालं. मुघलांविरुद्धच्या निर्णायक स्वातंत्र्ययुद्धात धनाजी जाधवराव- संताजी घोरपडे या पराक्रमी वीरांचा फार मोठा वाटा होता. मोघलांच्या पारतंत्र्यातून त्यांनी महाराष्ट्राचे रक्षण केले. इतिहासातील हा सर्व कालखंडच अनेक वीरश्रीयुक्त लढायांनी भरलेला आहे. त्याचे श्रेय छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, रामचंद्रपंत अमात्य, पंत प्रतिनिधी, धनाजी जाधवराव आणि संताजी घोरपडे यांनाच दिले पाहिजे. त्यातही धनाजी जाधवरावांच्या धारदार तलवारीने जे कार्य केले त्याला तोड नाही.
धनाजी जाधवराव प्रथम राजाराम महाराजांचे सेनापती होते. त्यानंतर महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू यांनी सेनापतीपदाची सूत्रे धनाजींकडेच सोपविली होती. राजाराम महाराजांनी त्यांना 'जयसिंहराव' असा किताब दिला होता, तो किती सार्थ होता हे त्यांच्या कामगिरीवरून लक्षात येतं. प्रा. डॉ. उत्तम हनवते यांनी मराठ्यांच्या या महान स्वातंत्र्ययुद्धाचा अनेक कागदपत्रांच्या साह्याने शोध घेतला आणि परिश्रमपूर्वक सदरील ग्रंथ सिद्ध केला. या ग्रंथात त्यांनी धनाजींच्या कामगिरीचे समर्पक आणि विस्तृत वर्णन केले आहे. त्याला जोड देत यादव उर्फ जाधवांचा समग्र इतिहासच त्यांनी साकारला आहे. मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक संशोधनपर ग्रंथ आहेत, त्यात प्रा. डॉ. उत्तम हनवते यांच्या या ग्रंथाचा समावेश करावा लागेल.
- जेष्ठ इतिहास संशोधक स.मा. गर्गे यांचं सदरील ग्रंथाबद्दलचं मत