Sea of Poppies | सी ऑफ पॉपीज Author: Amitav Ghosh | अमिताव घोष अनु. कुमार नवाथे
‘इबिस’ हे एक विशाल जहाज आहे. हिंदी महासागरातील मॉरिशियस बेटाकडे जाणार्या या जहाजामध्ये नाविक आहेत, फरार निर्वासित आहेत, कामगार व कैदी आहेत. एकोणिसाव्या शतकातील वसाहतवादाच्या काळात नियती काही भारतीय व पाश्चिमात्य मूळ असलेल्या, विविध क्षेत्रांतील लोकांना या जहाजावर एकत्र घेऊन येते - त्यात एक कंगाल राजा आहे, खेड्यातील एक विधवा स्त्री आहे, गुलामीतून मुक्त झालेला अमेरिकन आहे व स्वच्छंद, मनस्वी, अनाथ युरोपियन मुलगी आहे. प्रत्येक जण अफूयुद्ध व त्यातून घडणारे राजकारण यांनी या ना त्या पद्धतीने होरपळलेला आहे. हुबळीहून हे समुद्रयात्रेला निघतात तेव्हा पूर्णपणे भिन्न असलेले त्यांच्या पूर्वायुष्यातील बंध पुसून जातात व ते सहप्रवासी म्हणून जवळ येतात. सर्वांची एकच मनीषा असते - दूरवरच्या बेटावर जाऊन एक नवे आयुष्य सुरू करायचे. एका नव्या वंशाची सुरुवात!
‘सी ऑफ पॉपीज’ ही कादंबरी आपल्याला गंगेकाठच्या अफूच्या शेतातून पुढे नेत चीनचे सुंदर रस्ते व उफाळणारा समुद्र असा विस्तारपूर्ण प्रवास घडवते. वसाहतवादी व साम्राज्यवादी प्रवृत्तीतून चीन व ब्रिटिश यांच्यात झालेले अफूचे युद्ध; व या युद्धाचा दाह, झळ बसलेल्या लोकांतून यातील पात्रे उभी राहिली आहे. त्यांच्या संवेदना, त्यांचे भौतिक / सांसारिक संबंध व त्यांच्याकडून होणारा प्रतिरोध यांमुळे ही कादंबरी जिवंत बनते. अमिताव घोष यांचे थोर कादंबरीकार म्हणून सामर्थ्य सिद्ध होते, ते यामुळे!
सन्मान : ‘मॅन बुकर’ ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी दोनदा नामांकन. ‘साहित्य अकादमी’ व आता घोषित झालेला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार. याप्रमाणेच भारत सरकारने अमिताव घोष यांचा ‘पद्मश्री’ देऊन यापूर्वीच गौरवही केला आहे.