महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1875 ते 1939 या चौचष्ट वर्षांच्या कारकिर्दीत बडोदे संस्थानात आधुनिक लोकतंत्री शासनपद्धतीचा अनोखा प्रयोग केला.
राज्य चालविणे हे शास्त्र आहे त्यासाठी राजा ज्ञानी असला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी जगभरातील राजकीय प्रशासनपद्धतींचा अभ्यास केला आणि स्वत:च्या राज्यात सुशासनाचे अनेक प्रयोग राबविले.
सध्या जगभर ‘गुड गव्हर्नन्स’साठी विविध पातळ्यांवर प्रयोग व प्रशिक्षणाचे कार्यक्रम चालू आहेत.
या पार्श्वभूमीवर बडोद्याच्या राजकीय सुधारणांचे नव्याने चिंतन व अनुसरण व्हायला पाहिजे या भूमिकेतून महाराजांच्या राज्यप्रशासनविषयक निवडक भाषणांचे संकलन या तिसर्या खंडातून प्रसिद्ध केले आहे.
कागदी राज्यघटनेपेक्षा कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि सामाजिक पुनर्घटनेवर भर दिला पाहिजे हा सयाजीरावांचा दृष्टिकोन या भाषणातनू आपल्याला कळतो.
जनतेला नागरी हक्कांबरोबरच राजकीय सत्तेत सहभाग,
धर्ममूल्ये आणि नागरी मूल्ये यांची सांगड, अल्पसंख्याकांचे संरक्षण, श्वासत विकासाठी जमीनसुधारणा, सिंचन, आरोग्य, शिक्षण, दळणवळणाच्या संसाधनांचा विकास व सामान्यांना विकासाची फळे चाखता यावी यासाठी समन्यायी वितरण व सामान्यांना विकासाची फळे चाखता यावी यासाठी समन्याची वितरण यावर त्यांचा भर होता.
राष्ट्राची प्रगती होण्यासाठी कर्तबगार माणसे लागतात या जाणिवेतून सयाजीरावांनी विविध खात्यातील लोकसेवकांच्या कर्तव्याची संहिता तयार केली व त्यांना राज्यप्रशासनाचे प्रशिक्षण दिले.
या राजकीय प्रयोगांची हकिगत असलेली ही भाषणे लोकप्रशासनाच्या दृष्टीने एखाद्या राज्योपनिषदासारखी आहेत.
सुप्रशासनासाठी लागणारे बौद्धिक चैतन्य निर्माण करण्याची क्षमता ठासून भरलेली ही भाषणे जागरूक नागरिक, शासकीय अधिकारी, कामगार संघटनांचे नेते व राज्यकार्त्यांना प्रेरणादायी ठरतील असा विश्वास वाटतो.