संत-साहित्यासंबंधी तत्त्वज्ञानाच्या, आत्मिक उन्नतीच्या अनुषंगाने नेहमीच लिहिले जाते. परंतु संत ज्या काळात लिहीत होते, त्या काळातील ताण-तणाव कोणते होते, संतांवर कोणत्या गोष्टींचा दबाव होता, त्यातून त्यांचे चिंतन कसे आकारत गेले, यासंबंधीचा विचार सहसा केला जात नाही.
असा विचार ‘संतांची स्वप्नसृष्टी’ या ग्रंथामधून प्रथमत:च नागनाथ कोत्तापल्ले यांनी केला आहे. आर्थिक दारिद्य्र, जातीच्या उतरंडीचा काच आणि कर्मकांडात्मक धर्म या सामाजिक वास्तवाशी संतांना झुंजावे लागले, ते त्यांच्या चरित्रात्मक आणि आत्मचरित्रात्मक अभंगांमधून ठसठशीतपणे प्रकट होत राहते. या सामाजिक वास्तवाशी झुंजता-झुंजता ते मानवी जीवनासंबंधीचे एक भव्य स्वप्न पाहतात.
या स्वप्नात स्वातंत्र्य, समता आणि माणसाची प्रतिष्ठा कशी महत्त्वाची असते, हे ते सांगतात. त्यांतूनच काही कथा, चमत्कार कथाही निर्माण होत जातात. या चमत्कार कथांमागे तत्कालीन वास्तवच दडलेले असते. या वास्तवाचा शोध घेत गेलो की, संतांची समाजमनस्क चिंतनशीलता अधिकच महत्त्वाची आहे, हेही लक्षात येत जाते.
संत नामदेवांपासून संत बहिणाई यांच्यापर्यंत पसरून
राहिलेल्या स्वप्नसृष्टीचा हा एक आगळावेगळा आणि अभ्यासपूर्ण अन्वयार्थ