‘साधना पथ’ या पुस्तकात ओशोंच्या चौदा प्रवचनांचे संकलन केले आहे.
त्यामध्ये केवळ ‘स्व’ ध्यानाचे नाही, तर समाज आणि धर्माच्या ध्यानाचेही महत्त्व विशद केले आहे.
ध्यानसाधनेतून स्वत्वाची जाणीव उत्पन्न व्हावी म्हणून ओशोंनी अनेक उदाहरणे दिली आहेत.
केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सामान्य जीवन जगणार्यांच्या दृष्टिकोनातूनही यामध्ये चर्चा केली गेली आहे, शिवाय ओशोंनी निरसन केलेल्या शंका आपल्याला प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पहायला मिळतील.
स्वत्वाची जाणीव निर्माण होण्याबाबत ओशो म्हणतात, ‘‘साधना एकटेपणात, एकाकीपणात जन्माला येत असते; पण मानव तर कधीच एकटा नसतो.
तो नेहमीच गर्दीने वेढलेला असतो आणि बाहेर गर्दी नसेल तर अंतर्मनात विचारांची गर्दी असते. या गर्दीचे विसर्जन करायचे आहे.
तुमच्या अंतर्मनात गर्दी होऊ देऊ नका आणि बाहेरही या शिबिरात आपण एकटेच आहोत असं जगायचं आहे.
इतरांशी कसलाही संबंध ठेवायचा नाही.
संबंध ठेवता-ठेवता आपण स्वत:ला विसरून गेलो आहोत. तुम्ही कुणाचे मित्र आहात, शत्रू आहात, पिता आहात, पुत्र आहात, पती आहात, पत्नी आहात, या नात्यांनी तुम्ही इतके वेढले गेले आहात की, तुम्ही इतके निकट असूनही स्वत:ला ओळखू शकला नाहीत.
या नातेसंबंधांपेक्षा तुम्ही वेगळे आहात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नात्यांची ही वस्त्रे दूर करून तुम्ही स्वत:ला कधी बघितलं आहे का? ही नाती स्वत:मधून वजा करा.
असे समजा की, तुम्ही आपल्या आई-वडिलांचे पुत्र नाहीत, तुमच्या पत्नीचे पती नाहीत, आपल्या मुलांचे पिता नाहीत, मित्रांचे मित्र नाहीत, शत्रूंचे शत्रू नाहीत आणि मग जे काही शिल्लक उरतं तेच तुमचं वास्तव असणं आहे.
ही शिल्लक राहिलेली अधिसत्ताच तुम्ही स्वत: आहात. त्यातच आपल्याला राहायचं आहे.
ही सूत्रं अमलात आणली तर असं वातावरण तयार होईल जे शांती आणि सत्यानुभूतीची साधना करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.’’