Payal Books
Rudraprayag Narbhakshak Bibtyaa (रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या | सुप्रसिद्ध शिकारी व निसर्गसंवर्धक जिम कॉर्बेटच्या अजरामर शिकारकथा) By Jim Corbett
Couldn't load pickup availability
एका अवलिया शिकार्याच्या या अजब शिकारकथा आहेत. या थरारक आहेत, पण फक्त थराराचाच अनुभव देणार्या कथा नाहीत. माणूस आणि प्राणी यांच्यातला निसर्ग सांगणार्या, त्यांच्यातली पेचात टाकणारी समीकरणं दर्शवणार्या कथा आहेत. आजच्या गतिमान युगाला अपेक्षित टिपेच्या अनुभवाची कुठलीही कळ त्या दाबत नाहीत, पण पाऊलही न वाजवता निसर्गासोबतच्या दीर्घ प्रवासाची खुमारी आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणांचे अमीट तरंग त्या मनावर उमटवल्याशिवाय राहत नाहीत.
खड्ड्यात मरून पडलेला बिबट्या नरभक्षकच असल्याचं सिद्ध करण्यासाठीचा कोणताही पुरावा माझ्यासमोर नव्हता, पण तो नरभक्षक बिबट्याच असल्याचं समजायला मला एका सेकंदाचाही वेळ लागला नव्हता. मात्र तो त्या पंडितच्या भाषेतला कुणी सैतान नव्हता. मला रात्र रात्र जागायला लावून कुठूनतरी मला बघत असलेला, त्याला मारण्याचे माझे प्रयत्न व्यर्थ चाललेले बघून विकट हसत असलेला, माझ्या बेसावध होण्याची जिभल्या चाटत वाट बघणारा, माझ्या गळ्यात आपले सुळे रोवायच्या संधीची वाट बघत असणारा कुणी दुष्ट प्राणी नव्हता. इथे तर एक साधा, वय झालेला बिबट्या मरून पडला होता. त्याचा गुन्हा एकच होता. तोही निसर्गाच्या कायद्याच्या विरुद्ध केलेला गुन्हा नव्हता, तर मानवतेच्या विरुद्ध केलेला गुन्हा होता. तो म्हणजे, त्याने माणसाचं रक्त सांडलं होतं. त्यातून त्याला माणसांमध्ये दहशत माजवायची होती, असंही नव्हतं. तर त्याला स्वत:ला जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सगळे उद्योग केले होते!

