Rao Bahaddur Dattatray Balawant Parasnis – charitra aani Karya Author : Dr. Surendra Shrikrishna Parasnis लेखक : डॉ. सुरेंद्र श्रीकृष्ण पारसनीस
रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस – चरित्र व कार्य
लेखक : डॉ. सुरेंद्र श्रीकृष्ण पारसनीस
आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले वहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले.
शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली. शिक्षण म्हणजे सर्वस्व नव्हे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते पूर्ण झालेले पाहिले. आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. त्यांनी आपली कुवत जाणली होती त्याचबरोबर आपली ताकद ही पूर्णपणे जोखली होती. त्यांच्या ध्येयाच्या वाटेवर कोणकोणती आव्हाने आहेत? कोणते धोके पत्करावे लागतील? हे ते ओळखून होते. शिक्षणाची संधी जरी हुकली तरी, त्यांनी त्यांच्या इतिहासाच्या छंदाला मुरड घातली नाही. तो उत्तरोत्तर वाढतच गेला. संकटाचे संधीत रूपांतर करणे आणि आपली प्रगती करणे, ही शिकवण आजच्या युवा पिढीला त्यांच्या चरित्रातून घेता येण्यासारखी आहे.
एक सामान्य परिस्थितीतला युवक केवळ अतूट जिज्ञासा, असीम आत्मविश्वास आणि परिश्रमाची तयारी या शिदोरीवर केवढी मोठी झेप घेऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे पारसनीस यांचे जीवनचरित्र आहे.