Rangakatha Jayant Pawar Smrutigranth रंगकथा जयंत पवार स्मृतिग्रंथ Ganesh Visapute
Rangakatha Jayant Pawar Smrutigranth रंगकथा जयंत पवार स्मृतिग्रंथ Ganesh Visapute
जयंत पवार यांचं असणं मराठीच नव्हे तर भारतीय सांस्कृतिक आणि वैचारिक / सामाजिक परिप्रेक्ष्यात महत्वाचं होतं. आपल्या लेखन आणि जगण्यातून त्यांनी कायम पराभूतांची, वंचितांची, दुर्लक्षितांची बाजू घेतली. त्यांच्या नाटक, एकांकिका आणि कथांमधून याची अनेक जिवंत उदाहरणं सापडतात. सभोवतालच्या दमनाच्या आणि दडपशाहीच्या सर्वव्यापी रेट्यात आपली सौदर्यदृष्टी अबाधित ठेवत त्यांनी पराजितांचं नवं सौदर्यशास्त्र घडवलं. आपल्या भूमिकेशी तसूभरही तडजोड न करता ते पिचलेल्या आयुष्यांचे बहुपेडी पीळ आपल्या साहित्यातून नेकीनं व्यक्त करत राहिले.
जागतिकीकरणातून झालेला चंगळवादाचा स्फोट आणि त्यात नष्ट होत जाणारी माणसं त्यांनी केवळ सहानुभावानं पाहिली नाहीत, तर त्यांच्या होलपटीची असामान्य आख्यानं लिहीली. ते करताना आख्यानांचे नवे आयाम शोधले. वास्तवाकडे डोळेझाक न करता वास्तववादाच्या जाचातून मराठी कथेला मोकळं केलं. आपल्या लेखनातून आणि बोलण्यातून व्यवस्थेला प्रश्न विचारले आणि जगण्याच्या मुळाशी असलेल्या आदिम प्रश्नांचे गुंते जिवंत भाषेतून व्यक्त केले.
नव्या लेखकांचं लेखन आस्थेनं वाचून त्यांनी व्यक्त केलेल्या प्रामाणिक प्रतिक्रिया अनेक गुणवंत लेखकांना बळ देणाऱ्या आणि वाट दाखवणाऱ्या ठरल्या. त्यांच्या संपर्कात आलेल्या विविध क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या विचारप्रक्रियेवर त्यांच्याशी झालेल्या संवादाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम झाला. पवार यांचा मित्रपरिवार वैचारिक / सामाजिक मतभिन्नतेचे अडथळे सहज ओलांडून मूलभूत मानवतेच्या पायावर एकत्र येत विस्तारत राहिला. त्यांच्या प्रखर वैचारिक / सामाजिक भानाचे कवडसे अनिष्ट काळाचे अंधारकोपरे उजळत राहिले आणि यापुढेही उजळत राहतील.
– निखिलेश चित्रे