Skip to product information
1 of 2

Payal Books

Rajarshi Shahu, Karmaveer Bhaurao Patil Ani Prabodhankar Thackeray By Dr. Jaysingrao Pawar

Regular price Rs. 81.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 81.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
शाहू महाराज, भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे या तीन समाजधुरीणांचं कार्य अधोरेखित करणारं, या तिघांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं आणि या तिघांमधील संबंधांचं दर्शन घडविणारं पुस्तक म्हणजे राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे. यातील पहिल्या प्रकरणात या तिघांमधील संबंधांचं स्वरूप विशद केलं आहे. या तिघांच्या कार्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली आहे. शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संबंधांचा सविस्तर वेध घेतला आहे. डांबर प्रकरणाचा ओझरता उल्लेख या प्रकरणात केला आहे. प्रबोधनकारांच्या मदतीसाठी शाहू महाराजांनी पाठवलेला चेक प्रबोधनकारांनी कसा बाणेदारपणे नाकारला याचीही हकिकत या प्रकरणात सांगितली आहे. अंबाबाईचा नायटा याचाही उल्लेख या प्रकरणात आढळतो. क्षात्रजगद्गुरू पदाचा वाद, सातारची राज्यक्रांती, शाहू महाराजांची आणि प्रबोधनकारांची शेवटची भेट, शाहू महाराजांची बदनामी केल्याचा प्रबोधनकारांवर केला गेलेला आरोप आणि त्यामुळे उठलेले वादळ, भाऊराव पाटील आणि प्रबोधनकारांचे संबंध, नोकरी सोडून भाऊरावांनी वसतिगृहे स्थापायचे ठरवले, त्यासाठी धनजीशहा कूपर या उद्योगपतीचा पैसा आणि स्वत:च्या व्यवस्थापकीय कौशल्यातून कारखान्याची निर्मिती, कारखान्याच्या उत्पन्नाचा ठरावीक भाग भाऊरावांना देण्यास कूपर राजी, पण प्रत्यक्षात वेळ आल्यावर कूपरने केलेला विश्वासघात, त्यामुळे भाऊरावांचे त्याला बंदुकीने ठार मारायला निघणे आणि प्रबोधनकारांनी त्यांना त्यापासून परावृत्त करणे, श्री शाहू बोर्डिंगची भाऊरावांनी केलेली स्थापना, वसतिगृहासाठी फंड जमवताना महात्मा गांधींशी ठाकऱ्यांची झालेली जुगलबंदी, १९२३च्या निवडणुकीत भाऊरावांनी कूपरला चारलेली धूळ, प्रबोधन मधून ठाकरे यांनी प्रकाशित केलेले भाऊरावांचे छोटेसे चरित्र इ. हकिकती या प्रकरणात आल्या आहेत. त्याचबरोबर ठाकरे आणि भाऊसाहेब यांच्या चरित्रांवर अधिक संशोधन होण्याची गरज व्यक्त केली आहे. मराठीत प्रबोधनकारांचे समग्र संशोधनात्मक चरित्र उपलब्ध नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे आणि भाऊरावांच्या कार्याचा महिमा सांगितला आहे. १६ मे १९२२च्या प्रबोधनच्या अंकात राजर्षी शाहूंना श्रद्धांजली वाहणारा अग्रलेख प्रबोधनकारांनी लिहिला होता. तो या पुस्तकात समाविष्ट केला गेला आहे. या अग्रलेखात त्यांनी शाहू महाराजांच्या जाण्याने झालेली हानी, विविध लोकांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन, अनेक क्षेत्रांत महाराजांचा असलेला दांडगा वचक, त्यांनी पूर्णत्वाला नेलेली कामं आणि त्यांची अपूर्ण राहिलेली कामं, महाराजांची लोकप्रियता आणि त्यांचे विरोधक, ब्राह्मणेतरांची त्यांनी उभी केलेली चळवळ आणि एकूणच महाराजांचं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं अलौकिक कार्य यावर प्रबोधनकारांनी भाष्य केलं आहे. बॅ. पी. जी. पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे शिष्य. त्यांनी शाहू महाराज आणि भाऊराव पाटील यांच्या गुरू-शिष्य संबंधावर लिहिलेला लेखही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या लेखातून भाऊरावांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाच्या घटनांबद्दल पी. जी. पाटील यांनी लिहिलं आहे. भाऊराव पाटील शाहूराजांच्या संपर्कात कसे आले आणि भाऊरावांवर त्यांचा कसा प्रभाव पडला, हे या लेखात उद्धृत केलं आहे. डांबर प्रकरणामुळे भाऊरावांना नाहक सोसावा लागलेला तुरुंगवास आणि तुरुंगवासात त्यांचा झालेला छळ याचंही सविस्तर वर्णन या लेखात केलं आहे. शाहू महाराज आणि भाऊराव यांच्यातील संबंधांचं विलोभनीय दर्शन या लेखातून घडवलं आहे. एकूणच, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील संबंधांचं दर्शन घडविताना या त्रयीने केलेलं सामाजिक कार्य सहजतेने उद्धृत होतं. त्यांचं कार्य, त्यांच्यातील संबंध आणि त्यांची लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.