Putin By Girish Kuber पुतिन
Putin - Mahasattechya Itihasache Asvastha Vartaman | पुतिन - महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान
सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी देशाची सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांनी कसलाही विधिनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशांत त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काळ टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कटूप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल... आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबु-या कंगो-यांसह करून दिलेली ही ओळख...