बेळगावसारख्या गावातून सातासमुद्रापारच्या अमेरिकेत गेलेला ‘ श्री ठाणेदार ’ नावाचा धडपड्या मराठी मुलगा ! एका सामान्य घरातला हा तरूण आपल्या चिकाटीच्या आणि बुध्दिमत्तेच्या जोरावर मोठं यश मिळवतो. उद्योगपती होतो. पण दैवाच फासे नेहमीच अनुकूल पडत नाहीत. रोल्स रॉईस आणि फेरारीतून हिंडणार्या अब्जाधीश ‘श्री’ समोर व्यवसायातील मंदीमुळे सगळी मालमत्ता बॅंकेने जप्त करण्याच्या नामुष्कीची वेळ अचानक येऊन ठेपली. कसा सामोरा गेला तो या परिस्थितीला? कशी मात केली त्यानं या आव्हानावर? परत एकदा त्यानं उभारी घेतली का? वाचूया या प्रेरणादायी पुस्तकात....
इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि प्रयत्न केले, तर हवं तिथं पोचू शकतो, याचं प्रत्यंतर देणारी आजच्या घडीची सत्यकथा म्हणजे ‘पुन्हा श्री गणेशा’ !
श्रीनिवास ठाणेदार म्हणजेच श्री हा बेळगावच्या शाळेतून पंचावन्न टक्के गुण मिळवून मॅट्रिक पास झालेला एक सर्वसामान्य मुलगा, नंतर मात्र एस.एससीला पहिला काय येतो, अमेरिकेतील डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी काय मिळवतो आणि यशस्वी उद्योगपती म्हणून नावलौकिक काय कमावतो, सगळंच अगदी थरारक आणि कौतुकास्पद ! एका बाजूला पैसा, प्रसिध्दी आणि यश; तर दुसर्या बाजूला पत्नीनं केलेली आत्महत्या, समाजान्म वाळीत टाकणं आणि मग परक्या देशात दोन लहान मुलांना आई आणि बाबा होऊन वाढवणं! यश अपयश, सुख- दु:ख, मान-अपमान सर्वच काही टोकाचं! डॉ. श्री ठाणेदार या माणसांन परिस्थितीवर केलेली मात म्हणजे पुन्हा ‘श्री’ गणेशा !