Porya By Shailendra Pol
आपण जे पुस्तक हातात घेतलेले आहे, ते लौकिक अर्थाने ‘पुस्तक’ असले तरी प्रत्यक्षात ते निखारे आहेत. हे पुस्तक आगीचे चटके आणि विजेचे झटके देऊन वाचकाला त्याच्या निवांत कोशातून बाहेर यायला भाग पाडते; पण ज्याची संवेदनशीलता अजून टिकून आहे, त्यालाच या पुस्तकातील संवेदनांची वेदना कळू शकेल. हल्लीच्या ‘मोबाइल-फेसबुक-व्हॉट्सअॅप-ट्विटर’च्या जमान्यात संवेदना बधिर होऊ लागल्या आहेत. त्वचेची आणि मनाची संवेदना मेलेली असेल तर वेदना होत नाहीत. आपल्या समाजाने आपणहून स्वत:ला अॅनास्थेशियाचे इंजेक्शन टोचून घेतले आहे. या ‘मोबाइल अॅनास्थेशिया’ने समाज जर असाच गुंगीत राहिला, तर आपला सार्वत्रिक विनाश अटळ आहे. शैलेंद्र पोळ यांना तो विनाश अटळ वाटत नाही. त्यांना वाटते की, चटके किंवा शॉक देऊन समाजाची गुंगी उतरविता येईल. मी पोळ यांच्याएवढा आशावादी नसलो तरी या पुस्तकामुळे माझी झोप उडाली हे खरे.
या पुस्तकातल्या कथा काल्पनिक नाहीत. त्या अर्थाने हा कथासंग्रह नाही. हा व्यथासंग्रह आहे. त्या व्यथा आपल्या सार्वत्रिक असंवेदनशीलतेमुळे समाज भोगतो आहे. म्हणजेच आपण या वेदनांना, व्यथांना आणि हिंस्रतेला मूकसंमती देत आहोत. गुंगीचे औषध आपण स्वेच्छेने घेऊन इतरांना ते इंजक्शन दिले जात असताना नुसते पाहात बसलो आहोत.
हे पुस्तक वाचताना सतत मला अपराधीपणाच्या भावनेने वेढलेले होते. हा ‘गिल्ट कॉन्शन्स’ तुमच्याही अंत:करणात उमलला तर पुस्तकाचा हेतू सिद्ध होईल.
कुमार केतकर
ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत व राज्यसभा सदस्य
Porya - Shailendra Pol
पोऱ्या - शैलेंद्र पोळ