Parthivpujak Pu. Shi Rege पार्थिवपूजक पु. शि. रेगे – सुधीर रसाळ
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी कवितेला नवे रूप प्राप्त करून देण्यात बा. सी. मर्ढेकरांइतकाच पु. शि. रेगे यांचाही वाटा आहे. अन्य वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात कवितेच्या स्वरूपाच्या वेगळेपणाची — कवितेच्या विशुद्धतेची — अचूक जाणीव रेगे यांच्या कवितेतून प्रथम प्रकट झाली. शब्द हे कवितेचे केवळ माध्यम नाही तर ते कवितेचे साध्यही आहे; याची जाणीव असलेल्या या कवीने प्रथमच प्रचलित आणि निर्मितिशून्य असलेल्या शब्दांना निर्मितिक्षम बनवले. त्यांनी आपल्या कवितेतून अ-न्यूनातिरीक्त, सेंद्रिय स्वरूपाचा घाट घडवला.
मानवी अस्तित्वाला आवश्यक असणाऱ्या, परंतु मराठी कवितेकडून अस्पर्शित राहिलेल्या मूलभूत अशा स्त्री-पुरुष संबंधांच्या जीवनांगाला पु. शि. रेगे यांनी आपल्या एकूण साहित्याची निर्मितीसामग्री बनवली. मराठी कवितेने त्यागिलेला परंतु मुळात नैसर्गिक-प्राकृतिक असलेल्या आणि संस्कृत-प्राकृत कवितेतून व्यक्त होत असलेल्या शृंगारकाव्याशी आपल्या कवितेचे नाते जोडून काव्याच्या प्राचीन परंपरेचे रेगे यांनी पुनरुज्जीवन केले. त्यासाठीच प्राकृत काव्यातील ‘गाथा’ हा लघुकाव्यप्रकार मराठी काव्यात रुजवला.
शब्दांत सुप्तावस्थेत असणारे अनेकविध अर्थ निर्मितिक्षम बनवून त्यांनी कथा, कादंबरी, नाटक या गद्य प्रकारांतील साहित्यकृतींना अल्पाक्षरी आणि अर्थसमृद्ध असे रूप दिले. त्यांच्या ‘सावित्री’ आणि ‘रंगपांचालिक’ या साहित्यकृतींना अभिजात वाङ्मयकृतींचा दर्जा प्राप्त झाला आहे.
‘पार्थिवपूजक पु. शि. रेगे’ या आपल्या अभ्यासग्रंथात सुधीर रसाळ यांनी रेगे यांच्या समग्र साहित्याच्या स्वरूपाचा, त्यांच्या सामर्थ्य-मर्यादांसह अचूक वेध घेतला आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी कवितेला नवे रूप प्राप्त करून देण्यात बा. सी. मर्ढेकरांइतकाच पु. शि. रेगे यांचाही वाटा आहे. अन्य वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात कवितेच्या स्वरूपाच्या वेगळेपणाची — कवितेच्या विशुद्धतेची — अचूक जाणीव रेगे यांच्या कवितेतून प्रथम प्रकट झाली. पु. शि. रेगे यांच्या सर्व कविता सुधीर रसाळ यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.