Panifera By: Dr. Shrikant Patil
डॉ. श्रीकांत पाटील यांची 'पाणीफेरा' ही कादंबरी म्हणजे भारतीय कृषिव्यवस्थेचा आडवा छेद आहे. महापुराच्या काळात जलमय झालेल्या पाणीदार गावाची ही एक प्रेरणादायी कहाणी आहे. पाणीप्रश्राची सर्वांगीण चिकित्सा करणारी ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे. हल्ली निसर्ग लहरी बनला आहे. त्याला बव्हंशी आपणच जबाबदार आहोत. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी हा भारतीय कास्तकारांच्या कपाळी कोरलेला दुर्दैवी अभिलेख आहे. या अभिलेखाची कठोर आणि तितकीच शास्त्रशुद्ध चिकित्सा लेखकाने या कादंबरीत केली आहे.
पाणी असलं, तरी डोळ्यांत पाणी आणि पाणी नसलं, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी. वास्तविक पाणी म्हणजे जीवन, पण कधीकधी हेच पाणी जनजीवन बुडवायला, नासवायला निघतं. याची सांगोपांग चर्चा या कादंबरीत केली आहे. लेखकाची नाळ शेतीमातीशी बांधलेली असल्यामुळे या कलाकृतीला वास्तवाचे भक्कम अधिष्ठान लाभले आहे.
गावगाड्याला सोबत घेऊन चालणारा, सकारात्मक विचारसरणीचा उमदा नायक सुरेश है। या कादंबरीचे बलस्थान आहे. पाठीवरती हात ठेवून लढायचं बळ देणारी नाना आणि दादांसारखी खंबीर पात्रे या कादंबरीत आहेत. तशी सगळीच पात्रं अतिशय उठावदार आहेत. अक्राळविक्राळ रूपात अवतरलेला निसर्ग हेही या कादंबरीतील एक पात्र आहे. संकटाच्या वेळी गावाची एकी बघितल्यावर 'गाव करील तिथं राव काय करील' या विधानाची प्रचिती येते. वारंवार उद्भवणारी पूरपरिस्थिती टाळण्यासाठीचे शास्त्रशुद्ध उपाय संवादांतून उलगडत जातात. कोरोनाच्या नियमावलीमुळे पंधरा ऑगस्टची ग्रामसभा ऑनलाईन होते. भूमिपुत्रांनी केलेला हा तंत्रज्ञानाचा स्वीकार मोठाच आश्वासक आहे.
वारणा खोऱ्यातील बोलीभाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. परिसरभाषेतील अनेक लोकोक्ती ह्या कलाकृतीने मराठी वाङ्मयविश्वाला दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या वेळी रडायचं नाही, लढायचं. आल्या प्रसंगावर तुटून पडायचं. मोडलेला संसार पुन्हा उभा करायचा, हा शेतकऱ्यांचा निर्धार अतिशय बलशाली आहे! ज्वलंत विषयावरची ही कसदार कलाकृती मराठी साहित्यात मानाचे पान ठरेल, असा विश्वास वाटतो.
प्रा. डॉ. मथुताई सावंत