PAYAL BOOKS
Marathyanche Aarmar 1659 Te 1818 By Anuradha Kulkarni मराठ्यांचे आरमार १६५९- १८१८ डॉ. अनुराधा कुलकर्णी
Couldn't load pickup availability
Marathyanche Aarmar 1659 Te 1818 By Anuradha Kulkarni मराठ्यांचे आरमार १६५९- १८१८ डॉ. अनुराधा कुलकर्णी
मुरकुंबी इतिहास उपक्रम प्रकल्पाद्वारे आज शिवचरित्रकार मेहेंदळे सरांच्या प्रथम पुण्यस्मरण दिवशी मराठ्यांचे आरमार १६५९-१८१८ हा ग्रंथ प्रकाशित झाला. मंडळातील चित्रशाळेत लावलेल्या जहाज चित्रांसमोर उभे राहिले की मेहेंदळे सर नेहमी म्हणत की, चित्रातील ही जहाजे ज्यांनी बांधली त्यांनी या जहाजांचा वापर कसा केला असेल? या जहाजात बसून कोणत्या सागरी लढाया, ते जिंकले-हरले, सागरी व्यापार केला. मराठा आरमारातील हे राज्यकर्ते, सरदार कोण होते? या सर्वांच्या इतिहासासह ही चित्रे प्रकाशित व्हायला पाहिजेत तेच या तिनशे वर्षांपूर्वीच्या चित्रांचे योग्य मूल्यमापन आहे.
मेहेंदळे सरांची ही इच्छा आज माझ्या या पुस्तकरूपाने थोडीतरी पूर्ण झाली आहे असे मला वाटते.
मराठ्यांचे आरमार १६५९-१८१८ या पुस्तकात एकूण सहा प्रकरणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार उभारणीचे महत्त्व लक्षात यावे म्हणून पहिल्या प्रकरणात भारताचे प्राचीन आरमार आणि शिवपूर्वकाळातील आरमाराची ओळख करून दिली आहे. यामध्ये पुराणे, संस्कृत ग्रंथ, बौद्ध व जैन ग्रंथातील आरमाराचे उल्लेख, पेरिप्लसचे प्रवास वर्णन प्राचीन बंदरे, कान्हेरी-अजंठा-घारापुरी लेण्यातील शिल्प व चित्रे यामधील प्राचीन आरमारचे उल्लेख नकाशा आणि रंगीत व कृष्ण-धवल चित्रांद्वारे सांगितले आहे.
दुसरे प्रकरण छत्रपतींच्या आरमाराचे आहे. ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र! हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५८-५९ मध्ये पोर्तुगीज कारागीर विएंगास याच्या मदतीने पेण आणि कल्याण बंदरांवर जहाज बांधणी सुरू केली नवीन आरमार निर्मितीच्या कामात महाराजांना अनेक अडथळे आले. पोर्तुगीज कारगिर काम सोडून पळून गेले होते. परंतु कोणताही अडथळा हा अनेकांच्या दृष्टीने प्रवासाचा शेवट असतो. शिवछत्रपती मात्र, अडथळा हा प्रवासाचा आरंभ मानीत असत. शेवट नव्हे हे महाराजांच्या चरित्रातील अनेक प्रसंगांवरून दिसते. मराठ्यांचे आरमार हे महाराजांच्या याच दुर्दम्य इच्छाशक्तीचे उदाहरण आहे. याच प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती कोल्हापूर या सर्वांनी आरमाराचे महत्त्व ओळखून आरमाराची वृद्धी कशी केली हे मराठी पत्रव्यवहार, इंग्रजी कागदपत्रे, बखरी आणि नकांशांद्वारे दाखविले आहे.
तिसरे प्रकरण सरखेल कान्होजी आंग्रे व सरदार धुळप घराण्यांचे आरमारी महत्त्व सांगणारे आहे. या प्रकरणात आंग्रे व धुळप घराण्यांचा इतिहास सविस्तरपणे सांगितला आहे. कान्होजी आंग्र्यांपासून रघोजी आंग्र्यां पर्यंतचा आरमारी इतिहास यात मोडी व इंग्रजी-पोर्तुगीज कागदपत्रांद्वारे मांडला आहे.
ज्याचे आरमार त्याचा समुद्र ही उक्ती खरी करताना जिंकाव्या लागणार्या बसरूर, फोंडा, खांदेरी, जंजिरा, वसई या आरमारी मोहिमांचा पराक्रमी इतिहास प्रकरण चार मध्ये नकाशांच्या आधारे दिला आहे.
प्रकरण पाचवे हे आरमारी आर्थिक कारभाराचे आहे. मूळ मोडी कागदपत्रांच्या आधारे मराठ्यांच्या आरमाराचा संपूर्ण आर्थिक आढावा या प्रकरणात घेतला आहे. आरमाराला सँक्शन केलेले बजेट म्हणजे अंदाजपत्रकाच्या आधारावर घेतला आहे. या बजेट मध्ये सरकारने नेमुन दिलेली खर्चाची तरतूद कशी केली जात याची अनेक उदाहरणे आहेत. नवीन जहाज बांधणी, आरमारी अधिकारी खलाशी दर्यावर्दी यांचे पगार लढाया-दारूगोळा खर्च, जहाजावरील सैनिकांचे पगार-रोजखर्चाच्या रकमा, दर्यावर्दी सैनिकांच्या मृत्यूनंतर खलाशांच्या आई किंवा विधवांना दिली जाणारी बालपरवेशी असे खर्च आणि लढायांमध्ये मिळालेली लूट-दस्तके-परवाने या मार्फत आरमाराकडे झालेली जमा अशा अनेक नोंदी दिल्या आहेत. ज्यामुळे सुभा आरमार हा मराठ्यांच्या राज्याचा एक मोठा विभाग आपल्या समोर येईल.
प्रकरण सहामध्ये आरमाराशी संबधीत गिरी व जलदुर्गाची माहिती नकाशाद्वारे मांडली आहे.
ग्रंथात एकूण एक्क्याण्णव लहान लहान परंतु मूळ संदर्भ असलेली पोर्तुगीज, इंग्रजी व देवनागरी परिशिष्टे आहेत जी मराठा आरमारावर नवीन संशोधन करणार्या अभ्यासकांना उपयुक्त आहेत.
चारसे साठ पृष्ठ्यांच्या या ग्रंथात जहाजांची पंधरा रंगीत चित्रे. पाच वीरगळांचे रंगीत फोटो आणि सत्तावीस रंगीत नकाशे, तीन रंगीत मोडी पत्रे अशी एकूण बावन्न पाने रंगीत आहेत.
मराठा नौदल इतिहासाबद्दल पुराव्यांसहित आणि क्रमबद्ध माहिती उपलब्ध नसल्यामुळे मराठ्यांच्या शासनकाळात कोणतेही सुसंघटित आरमार असतीत्वात नव्हते. असा समज, आहे परंतु, मराठ्यांनी परदेशी शत्रूंपासून आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी, आपले आरमार मजबूत व शस्त्रास्त्रांनी सज्ज करून, जमीनी प्रमाणेच समुद्रातही या सर्व परदेशी शक्तींचा सामना केला आणि हे स्पष्ट केले की, मराठा राज्य त्या काळातही भूदल प्रमाणेच नावीक शक्तीतही पूर्णत्वाला पोचले होते आणि हे सत्य आज पोर्तुगीज, इंग्रजी, डच, मोडी अशा दस्तऐवजांच्या संदर्भासह या ग्रंथाच्याद्वारा आपल्यासमोर आले आहे.

