Marathisathi Loknagari| मराठीसाठी लोकनागरी Author: Pushpa Phadke |पुष्पा फडके
मराठी शुद्धलेखनातील अराजक हा एक सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. त्याचे खरे कारण म्हणजे मराठीचे लेखननियम हे संस्कृतनिष्ठ आहेत, पण आता संस्कृतचे ज्ञान संकुचित झाले आहे. त्यामुळे मराठीला मराठीच्याच पायावर उभे करण्याची वेळ आली आहे. मराठी भाषा ही केवळ अभिजनांची मक्तेदारी आता उरलेली नाही. कारण शिक्षणाचा प्रसार खेडोपाड्यापर्यंत झाला आहे. त्यामुळे मराठीच्या लेखनाचे सोपेकरण होणे आवश्यक आहे. म्हणून लेखनाचे कठीण नियम वगळून तिला उच्चारनिकडीच्या लेखनाची पायवाट मोकळी केली पाहिजे. पाणी/पानी असे कोणतेही उच्चाररूप वापरले तर काय बिघडेल? दोन्ही शब्दरूपांचा अर्थ सर्वांना समजतोच ना! ही सोपेकरणाची वाट अधिक रूंद करायची तर देवनागरी लिपीत काही बदल आवश्यक ठरतील. जसे - अनावश्यक असलेले स्वर/व्यंजने धाडसाने गाळून टाकणे, उच्चारात गोंधळ निर्माण करणार्या तालव्य व दंततालव्य ‘च’ वर्गाचे लेखन वेगवेगळ्या पद्धतीने करणे, र्हस्व/दीर्घ इकार-उकाराचे लेखन केवळ एकेरीच ठेवणे, योग्य जागी द्वित्त जोडाक्षरांचा वापर करणे (पुण्याची मुलगी/पुण्ण्याची शिदोरी). असे करताना प्रचलित १८ शुद्धलेखन नियमांऐवजी ७॥ नियमांनी लेखन करणे किंवा जोडाक्षर लेखनाच्या २२ प्रकारांऐवजी केवळ १॥ नियमांनी सगळी जोडाक्षरे लिहिणे शक्य असेल तर हे बदल आपण स्वीकारायला नकोत का? ‘‘शिक्षण सर्वांसाठी’’ या युनिसेफ प्रकल्पासंबंधी काम करताना मला हे विचार सुचले. त्यामुळे या बदलांना ‘देव’नागरी म्हणण्याऐवजी ‘लोक’नागरी म्हणणे योग्य ठरेल, नाही का?