Manavjateetichi katha by Sane guruji
मानवजातीची कथा
साने गुरुजी
माकडातून उत्क्रांत होत-होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार कोटी वर्षे लागली. त्याला ताठ उभे राहता यायला व दगडधोंड्यांनी आपले भक्ष्य मारून खाता यायला आणखी तीन लक्ष वर्षे लागली. पुढे आणखी पन्नास हजार वर्षे गेली आणि त्याला तांब्याचा शोध लागला. मारण्याची, संहाराची अधिक प्रभावी हत्यारे तो बनवू लागला. त्यानंतर दोन हजार वर्षांनी त्याला लोखंड सापडले. हिंसेची साधने अधिकच प्रखर अशी तयार झाली. मारण्याच्या पद्धतीत अधिक कौशल्य आले. लोखंडाच्या शोधानंतर पाच हजार वर्षांनी डायनामाइटचा शोध लागला. त्यानंतर कित्येक शतकांनी त्याने पाणबुड्या बांधल्या व विमाने बांधली, आणि दुसऱ्या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुद्धी पूर्णतेस पोहचली. मानवाच्या मत्थड मेंदूला 'हिंसा म्हणजे मूर्खपणा आहे'. ही गोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील. संहार करण्यापेक्षा हितकर व उपयोगी अशा दुसऱ्या उद्योगात वेळ दवडणे अधिक चांगले, ही गोष्ट तेव्हा त्याच्या लक्षात येईल.
मनुष्य अगदी मत्थड प्राणी आहे. फारच हळूहळू त्याची प्रगती होत आली आहे; आणि जी काही थोडीफार प्रगती झाली, तीही सारखी अखंड होत आली असेही नाही. कधी प्रगती तर कधी अधोगती, असे सारखे चालले आहे. उंचावरून कितीदातरी हा प्राणी खाली घसरला आहे; वर चढून पुन्हा कितीदा तो खाली पडला आहे.
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️