Mahatmyachya Pratikshet...By R K Narayan
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी कोणतंही कर्तव्य नसलेला श्रीराम भारतीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतो. निवांत व सुखासीन आयुष्य जगणारा श्रीराम तिला भेटल्यानंतर त्याने विचारही केला नसेल अशा प्रकारचं आयुष्य जगतो. भारती बुद्धिमान, तडफदार आणि देशाला वाहून घेतलेली व्यक्ती आहे. त्याउलट हा सामान्य, दिशाहीन आणि कोणतंही ध्येय नसलेला! त्यामुळे दोघांमध्ये होणार्या संवादात एक प्रकारची खुसखुशीत जुगलबंदी वाचायला मिळते. आर.के. नारायण यांनी गांधीजींची व्यक्तिरेखा या कादंबरीत विविध पैलूंमधून रेखाटली आहे. एकाचवेळी गांधीजी स्वातंत्र्य लढ्यातले लोकप्रिय लोकनेते आहेत, भारतीचे सर्वेसर्वा आहेत तर श्रीरामच्या दृष्टीने त्याच्या व भारतीच्या लग्नाला संमती देणारी एक महत्त्वाची व्यक्ती आहे. अशा सर्वच व्यक्तिरेखांचं रंगतदार चित्रण आर.के. नारायण या कादंबरीत प्रभावीपणे करतात आणि त्याचबरोबर अनेक घटना व प्रसंगांद्वारे कथेतील उत्कंठाही वाढवत नेतात.