Maharashtratil Band महाराष्ट्रातील बंड by Jitendra dikshit
प्रत्येक संघटनेत चढ-उतार तर असतातच; परंतु त्यांच्या या प्रवासात कित्येकदा अशा घटना घडतात, त्यापायी त्यांच्या अस्तित्वापुढे आव्हान निर्माण होतं किंवा त्या घटना त्या संघटनेलाच बदलून टाकतात. साठच्या दशकात जन्मलेल्या शिवसेनेने चार मोठी बंड पाहिली. बाळासाहेबांच्या हयातीतच पहिली तीन बंडं झाली. त्या वेळेस शिवसेना सत्तेत नव्हती. त्या बंडांनी शिवसेनेला हादरा बसला हे जरी खरं असलं, तरी पक्षावर त्याचा फार काळ प्रभाव राहिला नाही. पक्ष ठाकरे परिवाराच्याच हातात राहिला..., तथापि, जून २०२२ मध्ये झालेलं बंड त्या सगळ्याहून वेगळं आणि व्यापक होतं. या बंडाने उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता तर गेली आहेच. मात्र, शिवसेनेचा लगामही ठाकरे कुटुंबीयांच्या हातून हिसकावून घेतला जातो की काय, असा प्रश्नही उभा राहिला आहे. ज्यांनी अनेक दशकं शिवसेनेला पाहिलं आहे त्यांच्यासाठी ठाकरेंशिवाय शिवसेनेची कल्पना करणं सोपं नसेल. शिवसेना आणि ठाकरे हे एक-दुसऱ्याचे पर्यायी शब्द झाले होते. परंतु, म्हणतात ना, सगळे दिवस काही सारखे नसतात! शिवसेनासुद्धा मोठा बदल पाहते आहे.
हा राजकीय भूकंप कधी, कसा आणि का झाला याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. या बंडामागे कोणती कारणे होती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मागे उद्धव ठाकरे त्यांचं साम्राज्य सांभाळू शकले नाहीत का...?
हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणाऱ्या या पक्षामधील या महाबंडाचा सखोल आढावा म्हणजेच हे पुस्तक होय.