ग्रामीण व्यक्ती आणि समष्टीच्या समग्र अस्तित्वाला चिकटून असणाऱ्या मातीच्या अभिजात संस्काराची, शिवाय वाचक व आलोचक यांना अभिमत झालेली कथा श्री. सदानंद देशमुखांनी लिहून मराठी माती वैभवगामी केलेली आहे. व्यक्तींचे भावतरंग ठसठशीत उमटवणाऱ्या त्यांच्या कथांनी जीवामनांच्या घुसमटींचे अगणित पदरही लीलया उकलून दाखविले आहेत. ग्रामव्यवस्थेत रुतून वसलेल्या असलेल्या वडिलांच्या आणि मुलांच्या पिढीमधील धुमसणारे ज्वलनशील अंतर्विरोधाचे रसायनही त्यांची कथा ताकदीने दाखविते. स्त्रियांच्या अंतःकरणात दबलेल्या, दाबलेल्या जाळाला प्रकट करणारी देशमुखांची कथा स्त्रियांच्या मनातून वाहणाऱ्या भाव आणि जिव्हाळा यांच्या प्रवाही झऱ्यांनाही खळाळत ठेवते. काबाड आणि वेदना, भोग आणि भय, जीव आणि दैना, दशा आणि आसक्ती, अर्थ आणि आशा, कुचंबना आणि जिद्द या अवघ्या घटकांचा मेळ जमवून आणणारी देशमुखांची कथा व्यक्ती, प्राणी, जीवजितराब अथवा तमाम जीवसृष्टीला त्यांच्या एकूण सर्व तऱ्हेच्या विकारा-संस्कारांसकट सारी ताकद लावून अवतीर्ण करते. या कथामधून मानवी वृत्ती- मनोवृत्तीची नाना रूपे जशी साकार होतात तद्वतच भ्रष्टाचार आणि भ्रष्ट आचार यांचीही विरूपजन्य स्थिती अक्षरांत बांधायला ही कथा कचरत नाही. सर्व जीवांच्या घुसमटीचा आलेख मांडणाऱ्या देशमुखांच्या कथेत प्राणिमात्रांच्या भावधर्माचे अंतरंग संदर्भासह जिवंत होऊन आले आहेत कारण या कथाकाराकडे जगण्याची कणखर जमीन आहे. रंगरंगोटीपासून फारच दूर असणाऱ्या या कथाकाराला माती व माणसाचे अंतरंग अगदी तळापासून कळलेले असल्यामुळे मनाला भिडणारी, मेंदूला ढवळून काढणारी कथा ते लिहू शकले आहेत. एका अर्थाने अवघी माती सोलून पहाण्याची क्षमता अवगत असलेल्या देशमुखांनी ग्रामविश्वाचा वर्तमाननामा कथांमधून ओतून आपली सर्जकशक्ती, गहिरे चिंतन आणि कथाद्रव्यांशी एकरूप पावणारी तादात्म्यता ही सामर्थ्यसूत्रेही सिद्ध केलेली आहेत. या सामर्थ्यसूत्रांचा साक्षेपी आविष्कार प्रस्तुत कथासंग्रहातून घडतो. अदम्य ऊर्जाशक्ती आणि जिवंत सर्जकता यांच्या एकवटलेल्या बळावर मराठी ग्रामीण कथेला खोल चिंतनाच्या नव्या पटावर आणून ठेवणाऱ्या ह्या कथा आहेत.
Payal Books
Mahalut | महालूट by Sadanand Deshmukh | सदानंद देशमुख
Regular price
Rs. 143.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 143.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
