Madhu Mangesh Karnik: Vyaktimattva Aani Vangmain Kartuttva|मधु मंगेश कर्णिक : व्यक्तिमत्त्व आणि वाङ्मयीन कर्तृत्व Author: Dr. Mahesh Kharat |डॉ. महेश खरात
मधु मंगेश कर्णिक हे मराठीतील एक सव्यसाची साहित्यिक आहेत. गेल्या पन्नास वर्षांत सहाशेहून अधिक कथा, ‘देवकी’, ‘माहीमची खाडी’, ‘भाकरी आणि ङ्गूल’, ‘सनद’, ‘जुईली’, ‘वारूळ’, ‘संधिकाल’ इत्यादी दहा कादंबर्या, आठ ललित लेखसंग्रह, तीन व्यक्तिचित्रसंग्रह इत्यादी विविधांगी साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. तीन नाटक, बालसाहित्य, कविता, संपादने अशाही स्वरूपाच्या निर्मितीचा समावेश होतो. ‘जैतापूरची बत्ती’ हे त्यांचे अगदी अलीकडचे पुस्तक त्यांच्या कोकणप्रेमातून निर्माण झाले आहे. त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व हे कोकण या जन्मभूमीशी तसेच मुंबई या महानगरीशी अंतर्बाह्य स्वरूपात संबंधित आहे. नवनव्या विषयांचा कुतूहलपूर्ण वेध घेणारे, बहुविध जीवनानुभवांचे सहानुभूतिपूर्ण चित्रण करणारे, मानवतावादी भूमिकेतून दु:खाशी सहकंप पावणारी साहित्यनिर्मिती करणारे, भावनांना आवाहन करणारे तरीही विचारांना प्रेरणा देणारे, माणसाच्या अध:पतनाचा आणि सामाजिक-सांस्कृतिक मूल्यर्हासाचा आलेख रेखाटणारे, सुगम, आवाहक साहित्यनिर्मिती करणारे लेखक म्हणून मधु मंगेश कर्णिकांचे मराठी साहित्यातील स्थान अढळ आहे.
मधु मंगेश कर्णिक : व्यक्तिमत्त्व आणि वाङ्मयीन कर्तृत्व या ग्रंथात डॉ. महेश खरात यांनी कर्णिक यांच्या समग्र वाङ्मयाचा सूक्ष्म वेध घेतला आहे. कर्णिकांच्या लेखनाचे बहुविध विशेष या ग्रंथामधून त्यांनी सप्रमाण विशद केले आहेत. त्यामुळे मधु मंगेशांच्या व्यक्तिमत्त्वावर व कार्यकर्तृत्वावर चांगला प्रकाश पडला आहे. गेवराई येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या र. भ. अट्टल महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहात असलेल्या डॉ. महेश खरात यांच्या प्रस्तुत ग्रंथामुळे कर्णिकांविषयीच्या साहित्यसमीक्षेत मोलाची भर पडली आहे.