Laurel Ani Hardy (लॉरेल आणि हार्डी) By Khanderao Kelkar
चित्रपटसृष्टी वास्तवाचे जग आणि स्वप्नाचे जग या दोन्ही जगांना स्पर्श करते. चित्रपट हा एक आरसा आहे. परंतु हा आरसा नित्य जीवनात वापरला जाण्यासारखा निव्वळ स्वच्छ प्रतळाचा नाही. तो अंतगोल किंवा बहिगोल असल्याने त्यातील प्रतिमा सत्य जीवनापासून फारकत केलेल्या आढळतात. अवास्तवतेचे झिरझिरीत आवरण घेतलेली वास्तवता मनाला भावते. प्रत्यक्ष सत्यापेक्षा सत्याभास जास्त मनोवेधक वाटतो. चित्रपट आपल्या अंतर्मनातील बालसदृश्य मनाला स्पर्श करते. प्रकाशाचा प्रवास अनाकलनीय आहे, त्याचप्रमाणे चित्रपटाची अभासमय सृष्टी मनाला का भावते, याचे उत्तर सापडणे कठीण आहे. लॉरेल आणि हार्डी यांच्या अभिनयाचे आणि कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्याचे ठरविल्यास या विचारांचा संदर्भ आणि कित्येक वेळा आधार घ्याला लागेल.