Skip to product information
1 of 2

Payal Books

KGB CHE ANTARANG के जी बी चे अंतरंग विजय देवधर by VIJAY DEVDHAR

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

के.जी.बी.चे अंतरंग
लेखक - विजय देवधर

के.जी.बी. ही रशियन गुप्तचर संघटना स्वतःसंबंधी कमालीची गुप्तता पाळते. तसे पाहू गेले, तर रशियाच्या अंतर्गत, राजकीय व सामाजिक घडामोडींबद्दल जगाला कधी फारशी माहिती मिळत नाही. याच गोष्टीवरून ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी रशियाला ‘पोलादी पडदा’ (IRON CURTAIN) असे संबोधले होते. तथापि अलीकडच्या काळात रशियाच्या बर्याच गुप्त गोष्टी जगाला समजल्या आहेत. पाश्चिमात्य गुप्तचर संघटनांनी मिळविलेल्या माहितीवरून आणि रशियातून पळून येऊन, पश्चिमेचा आश्रय घेतलेल्या रशियन गुप्तवार्ता खात्यातल्या काही अधिकार्यांकडून समजलेल्या गोष्टींवरून सोवियत रशियाचे आणि त्यांची गुप्तचर संघटना के.जी.बी. हिचे स्वरूप बरेचसे स्पष्ट झाले आहे.
प्रस्तुत पुस्तकात केवळ के.जी.बी.ची माहितीच दिली आहे असे नाही, तर या गुप्तचर संघटनेशी संबंधित असलेल्या काही अतिशय वेधक अशा कथांचा समावेशही या पुस्तकात केलेला आहे.
पहिल्या कथेत फ्रेंच राजदूत मॉरिस दीजाँ यांचे चारित्र्यहनन करण्याचा आणि त्यांना भ्रष्ट करण्याचा जो धूर्त डाव के.जी.बी.ने टाकला होता, त्याची विलक्षण मनोवेधक अशी हकीकत आहे. ‘स्त्री’ हा दीजाँचा वीक पॉइंट लक्षात घेऊन, एका अतिशय सौष्ठवपूर्ण नि बांधेसूद शरीराच्या रशियन सुंदरीच्या साहाय्याने दीजाँना के.जी.बी.ने कसे भ्रष्ट केले याचे विलक्षण दर्शन प्रस्तुत कथेत घडते.
दुसर्या कथेमध्ये एक फितूर अमेरिकन सोल्जर सार्जंट रॉबर्ट ली जॉन्सन याला आपल्या वेठीस धरून फ्रान्समधल्या पेंटॅगॉनच्या अभेद्य अशा गुप्त तिजोरीतली लष्करी गुपिते के.जी.बी.ने कशी हस्तगत केली, याची कल्पिताहूनही अद्भुत अशी सत्य हकीकत आहे. जिथे मुंगीलाही प्रवेश मिळणे अशक्य होते, अशा त्या ‘सिक्रेट व्हॉल्ट’ मध्ये शिरकाव करून घेण्यासाठी के.जी.बी.ने धूर्तपणे कोणत्या युक्त्याप्रयुक्त्या नि हिकमती लढवल्या याचे मती गुंग करणारे प्रत्यंतर वाचकांना येईल.
‘मिराज विमान पळविण्याचा कट’ या तिसर्या कथेमध्ये लेफ्टनंट महमुद मात्तार नावाच्या एका लेबानीज फायटर पायलट माणसाला कचाट्यात पकडून के.जी.बी.ने त्याला हेरकामास कसे जुंपले याचे विदारक दर्शन आहे.
के.जी.बी.ची माहिती आणि तिची काही प्रकरणे सांगतासांगताच अशा कथांचा प्रस्तुत पुस्तकात अंतर्भाव केल्यामुळे हे पुस्तक वाचनीय ठरेल आणि वाचकांना आवडेल, अशी आशा आहे. हे संबंध पुस्तक विचार करायला लावणारे आहे. एक गुप्तचर संघटना आपली उद्दिष्टे साध्य करण्याकरता कोणकोणत्या उलाढाली करते, आपल्या मोहिमा राबवण्याकरता काय काय गोष्टी करते याचे दर्शन घडवणे हा या पुस्तकाच्या लेखनामागचा हेतू आहे. के.जी.बी.चे हे अंतरंग वाचताना-राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम अशी गुप्तचर व्यवस्था किती आवश्यक नि महत्त्वपूर्ण असते, याचा प्रत्यय वाचकांना जागोजाग येईल.