Kavyaswa By: Vishwas Vasekar
प्रा. विश्वास वसेकर यांचा 'काव्यस्व' हा काव्यसमीक्षेवरचा ग्रंथ मराठी कवितेच्या अनेक अंगांचा अर्थपूर्ण वेध घेतो. काव्यमीमांसेचा एक विस्तृत फलक हे या काव्यसमीक्षेवरील ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यातील काव्यमीमांसेला प्राकृत भाषेतील हालाच्या 'गाथा सप्तशती' पासून प्रारंभ होतो. महानुभाव कवी भास्करभट्ट बोरीकर, बालकवी, अनिल बेथपासून ते अलीकडील इंद्रजित भालेराव यांच्यापर्यंत अनेक कवींच्या काव्याचा परामर्श या लेखसंग्रहात घेण्यात आलेला आहे. ज्या कवींच्या काव्याच्या परामर्श विश्वास वसेकरांनी घेतला आहे ते कवीही वेगवेगळ्या संप्रदायांचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांच्यावरील विवेचनातून एकूण मराठी काव्याचे, त्यातील प्रवाहांचे एक समग्र चित्र वाचकांसमोर उभे राहते. कविमीमांसेच्या जोडीला विश्वास वसेकरांनी मराठीतील विडंबन कविता, आदिवासी कविता, बालकविता अशांसारख्या काही दुर्लक्षित काव्यपरंपरांचीही मीमांसा केली असल्यामुळे त्यांनी साकार केलेल्या मराठी कवितेचा चित्राला एक समग्रता लाभली आहे.
गझल हा फारसी-उर्दूतला काव्यप्रकार मराठीत चांगल्याप्रकारे रुजत चाललेला आहे. मराठीत लिहिली गेलेली बहुतेक गजल ही भावकवितेच्या स्वरूपाची आहे. गझल या वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकाराची आणि उर्दू-हिंदीतील गझलेची अधिकृत अशी स्वरूपमीमांसा करणारे लेखन हा या संग्रहाचा एक महत्त्वाचा आणि अनोखा भाग असून मराठी गझललेखकांना त्यांच्या गझलनिर्मितीमध्ये तो मार्गदर्शन
करणारा ठरेल.
मराठी काव्यपरंपरेचा व्यापक वेध घेणारा हा काव्यसमीक्षा-ग्रंथ वाङ्मयाभ्यासकांबरोबरच काव्यरसिकांनाही उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
सुधीर रसाळ