Kashir by Sahana Vijayakumar,Uma Kulkarni
ही कादंबरी लिहिण्यासाठी केवळ सृष्टिसौंदर्य पाहाण्यासाठी केलेला प्रवास मुळीच उपयोगाचा नव्हता. धोकादायक प्रदेशांत, तिथल्या गल्ली-बोळांत फिरणं आवश्यक होतं. जिथं पुरुषांच्याच जिवाला धोका, तिथं स्त्रियांना तर त्याहीपेक्षा जास्त भीती ! अशा परिस्थितीत या लेखिकेनं न घाबरता 'घरवापसी' करणाऱ्या आणि घेट्टोत राहात असलेल्या मोजक्या हिंदूंशी संपर्क साधला, त्यांची मदत घेतली आणि तिथं धाकदपटशानं हजारोंच्या संख्येनं होणारं धर्मांतर, अत्याचार, एवढंच नव्हे तर, रक्तपात घडलेल्या स्थळांना भेट दिली. आजही भयग्रस्त होऊन, जीव मुठीत धरून जगत असलेल्या हिंदू वृद्धांची, मुलांची, तरुण-तरुणींची भेट घेऊन त्यांच्याशी त्या बोलून आल्या आहेत. एके काळी भारतीय संस्कृतीचं समृद्ध स्थळ असलेलं, अक्षरशः शारदेचं निवासस्थान मानलं गेलेलं काश्मीर तेजोहीन होऊन आज म्लेंछ धर्मापुढे का शरणागत झालं आहे, याच्या तपशिलाचा शोध या लेखिकेनं घेतला आहे. या विषयावर दीर्घ अध्ययन केल्याशिवाय, दररोज रक्तपात होत असलेल्या या प्रदेशात राहून घटना साकार करून घेतल्याशिवाय अशा प्रकारची कादंबरी लिहिणं शक्य नाही. तेही काश्मिरी विद्वानांचं मार्गदर्शन मिळवून. भारतीय अध्यात्मात आत्म्याला स्त्री-पुरुष असा भेद नाही. तसंच सर्जनशीलताही कुठल्याही लिंगभेदापलीकडे असते. ज्यांना हा भेद ओलांडता येतो, तेच महत्त्वाचे 'लेखक' म्हणून वाढू-विस्तारू शकतात. अशा प्रकारची प्रमुख लेखिका होण्याचे सगळे गुणधर्म सहना यांनी इथे व्यक्त केले आहेत.