Iti Aadi By Arun Tikekar
‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….
या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”