म.फुले-शाहू-आंबेडकर-वि.रा.शिंदे-भाऊराव पाटील आणि अनेकांना मदत करणारे युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड.
शाळा न शिकलेला शेतकऱ्याचा बारा वर्षांचा हा पोरगा. योगायोगानं राजा बनतो. राजगादीवर आल्यानंतर चिकाटीनं शिकून शहाणा होतो. अचानक लाभलेल्या संधीचं स्वतःच्या कर्तृत्वानं सोनं करतो. अशा जगावेगळ्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांची ही गोष्ट. शिक्षण हेच प्रगती आणि परिवर्तनाचं साधन आहे, हे हा तरुण राजा ओळखतो.
अस्पृश्य-आदिवासी प्रजेला शिकविण्याचा पहिला राजहुकूम काढतो. वंचितांच्या दारी शिक्षणाची गंगा आणतो.
सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यताबंदी, वेठबिगारी संपविण्याचे कायदे करतो. लोककल्याणाची कामे करतो. उत्तम प्रशासनाची घडी घालतो. जुन्या रूढी-चालीरीतींचे उच्चाटन करून सामाजिक सुधारणांचे कायदे करतो. फुले-शाहू-आंबेडकर, ना. गोखले-गांधी-टिळक, न्या. रानडे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे यांसारख्या युगपुरुषांना मदत करतो. लेखक-कलावंत-संस्था-क्रांतिकारक मंडळींना कोट्यवधींची मदत करतो.
जाती-पातींच्या भिंती तोडून समतेचा मार्ग दाखवितो.
गरजू विद्यार्थ्यांना देशात-परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्त्या देतो. भीमराव आंबेडकर त्यातले एक.
प्रजेविषयी आस्था, प्रशासनातील योजकता, निर्णयातील दूरदृष्टी आणि : नेमके नियोजन, हे सयाजीराव महाराजांचे वैशिष्ट्य होते. राज्याचे नवनिर्माण कसे करावे, याचा स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. सयाजीराव सांगून गेले, “बलसंपन्न भारत हे माझं स्वप्न आहे. येथील तरुण-तरुणीच ते पूर्ण करतील. मित्रांनो, शिक्षण हेच साधन आहे. आवश्यकता आहे तुमच्या कष्टाची, प्रामाणिकपणाची, देशप्रेमाची आणि शेजाऱ्यांशी बंधुप्रेमानं वागण्याची. ह्या चार गोष्टी तुम्ही अंगी बाळगा. आपलं स्वप्न पुरं होईल.”