पाणी म्हणजे जीवन.
पाण्यात पाणी मिसळले की नवा प्रवाह निर्माण होतो.
वैनगंगा आणि पैनगंगा मिसळून प्राणहिता तयार होते.
उषा व प्रभा मोहनी ह्या दोघी बहिणींच्या सृजनाचे
प्रवाह मिसळल्यावरही एक ‘प्राणहिता’ जन्मली.
ह्या प्राणहितेने मग आपलं बालपण आपल्या कडेवर घेतलं.
त्याच्या पायातल्या घुंगुरवाळ्याने सारं वातावरण भारून टाकलं.
त्याला चढवलेलं शब्दांचं बाळलेणं म्हणजे हे पुस्तक.
ह्यातील प्रत्येक ललितबंधातून रस-रंग-गंध-प्रतिमांचे
एक अनाघ्रात कोवळे जग आपल्यासमोर उलगडत जाते.
त्याचे नाते असते कधी जमिनीशी,
तिच्यात नाक खुपसून घेतलेल्या गंधाशी.
कधी किणकिणत्या घुंगुरवाळ्याशी,
तर कधी दु:खलाघवाशी.
आज लुप्त झालेल्या एका रसरशीत तरीही शांत जगाचे
विलक्षण कोवळीक व निरागस विनोदबुद्धी ह्यांनी केलेले हे चित्रण
वाचकाला स्मरणरंजनाच्या पलिकडे,
केवलानन्दाकडे घेऊन जाईल.