Gavtidha By: Pradip Dhondipa Patil
कै. प्रदीप धोंडिबा पाटील यांची 'गावतिढा' ही कादंबरी प्रकाशित होत आहे. पुस्तकाचा जन्म ही आनंदाचीच बाब ! पण या कादंबरीबाबत काय म्हणू? ऑक्टोबर २०२० मध्ये प्रदीप धोंडिबा पाटील यांचे मला पत्र आले. त्यांची नवी कादंबरी नुकतीच लिहून पूर्ण झाली होती. ती मी प्रकाशित करावी अशी त्यांनी इच्छा प्रकट केली होती. माझी त्यांची ओळख नव्हती. पण या विषयासंदर्भात, माझे स्नेही ऋषिकेश देशमुख माझ्याशी बोलले होते.
हस्तलिखित वाचून काढले. लयदार भाषा, ग्रामीण ढंग, अस्सल मराठवाडी बोली असलेले उत्स्फूर्त, आविष्करण, मला कादंबरी खूप आवडली. ग्रामजीवन हा माझा आवडीचा प्रांत! ग्रामीण जीवनात बदलत्या जीवनशैलीने, यांत्रिकीकरणाने, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतीला मिळणारे अनुदान, फुकटखाऊ गावटगे हे गावागावात पाचवीला पुजलेत. त्यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. हा विषय या पूर्वी आला नाही.
काम सुरू झाले. मुखपृष्ठ मनाजोगे होत नव्हते. पाटीलसरांचा फोन आला.
"मुखपृष्ठ झाले का?" मी म्हणाले, "सर, झालंय पण मनात उतरत नाही, थोडा वेळ द्या." वेळ नव्हता हे तेव्हा कुठे माहीत होते. अवघ्या चार-पाच दिवसांत बातमी आली. 'प्रदीप धोंडिबा पाटील यांचे निधन' छातीत धस्स झाले. कोरोनाची दुसरी लाट आप्तेष्टांवरच आदळली होती. कोण जाईल सांगता येत नव्हते. आयुष्याचे मूल्य शून्यावर आले होते. रोज आज कोणाची बातमी इतकंच पाहायचं, पाटील सरांनी मनाला चटका लावला. न पाहिलेले माझे हे लेखक मनात घर करून गेले.
पुस्तक तयार झाले, पण सर नाहीत याचं फार वाईट वाटतंय. ही कादंबरी म्हणजे संस्कृती प्रकाशनाकडून सरांना भावपूर्ण आदरांजली आहे. एक अस्सल ग्रामीण लेखक मराठी साहित्याने गमावला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना....