“दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कृ.अ. केळूसकर हे गेल्या शतकातील मोठे विचारवंत, विख्यात चरित्रकार. गौतम बुद्ध, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी या युगपुरुषांचे ते मराठी भाषेतील पहिले महत्त्वाचे चरित्रलेखक.
गुरुवर्य केळूसकरांमुळेच डॉ. आंबेडकरांसारखे नेते समाजास मिळाले. जनात जनार्दन पाहणारे ते ऋषितुल्य प्रज्ञावंत होते. मामा परमानंद, न्या. रानडे या विचारवंतांनी त्यांच्या लेखणीची व विचारांची त्या काळात प्रशंसा केली.
धर्मशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र या चौफेर विषयांतील ते पंडित होते. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आणि मराठा ऐक्येच्छू सभेसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. ते गीता आणि बौद्ध धर्माचे भाष्यकार होते.
पुरोगामी महाराष्ट्राने केळूसकरांच्या एकूण लेखनाची म्हणावी तशी दखल घेतली नाही.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुण हेरून मदत केली तशीच मदत केळूसकरांनाही केली. गायकवाड ओरिएंटल सिरीजमध्ये ‘गौतम बुद्धांचे चरित्र’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळेच पहिल्यांदा गौतम बुद्धांची ओळख ठळकपणे मराठी वाचकांस झाली.
“गौतम बुद्धांचे चरित्र हा मराठी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथ आहे.”
– डॉ. धनंजय कीर