Gandhi Parabhut Rajkarani Ani Vijayi Mahatma गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा by Raosaheb Kasbe रावसाहेब कसबे
Gandhi Parabhut Rajkarani Ani Vijayi Mahatma गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा by Raosaheb Kasbe रावसाहेब कसबे
कोणत्याही महापुरुषाला त्याच्या पूर्ण रूपात समजून घेणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्यातल्या त्यात गांधीजींना. हा ‘महात्मा’ आध्यात्मिक होता. म्हणून स्वत:ला जडवादी, विवेकनिष्ठ, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष वगैरे समजणारे गांधींकडे तुच्छतेने पाहतात. त्यापैकी काहींचा गांधी हा टवाळीचा विषय असतो. मात्र गांधींच्या विचाराची सुरुवात सत्याच्या शोधापासून झाली. त्यामुळे गांधीजींचे नथुरामच्या पिस्तुलातील गोळ्यांनी सांडलेले रक्त फुकट वाया जाईल असे वाटत नाही.
– डॉ. रावसाहेब कसबे
गांधी चरित्र नाही, तर गांधीजींकडे बघण्याचा एक नवा आयाम देणारे पुस्तक.. अस्पृश्यतेच्या बाबतीतील गांधीजींची काळानुरुप बदललेली धोरणे, गांधी-आंबेडकर संबंध हा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. लेखक स्वतः आंबेडकरवादाचे व मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांनी गांधींच्या धोरणांना या दोन वादांच्या चष्म्यातून पाहिलेले वारंवार जाणवते. परंतु गांधींच्या राजकारणी आणि महात्मा या संज्ञांची चिकित्सा करताना गांधीजींच्या ११ व्रतांपैकी सत्य, अहिंसा आणि ब्रम्हचर्य याच ' ठराविक ' व्रतांची तपासणी लेखकाने केलेली आहे, जे इतर अनेक लेखक सुद्धा करतात. इतर व्रतांची चिकित्सा होणे सुद्धा गरजेचे होते. तसेच, या तीन व्रतांची चिकित्सा देखील कुठेतरी अपुरी राहिल्याप्रमाणे वारंवार जाणवत राहते. ' सत्याग्रही समाजवाद ' या समन्वयी विचाराचे विश्लेषण होणे देखील गरजेचे होते. ७४० पानी पुस्तकाचा समारोप करताना, गांधीजींचं राजकारण पराभूत का झालं आणि त्यांचं महात्म्य विजयी का ठरलं याच्यावर निदान ५ ते ७ पानांचं सारांशलेखन केलं जाणं उचित ठरलं असतं असं मला वाटतं... गांधींच्या अभ्यासकाने जरूर वाचला पाहिजे असा ग्रंथ !!