Skip to product information
1 of 2

Payal Books

Gada गाडा by Akshay Temkar अक्षय टेमकर

Regular price Rs. 230.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 230.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

अक्षय टेमकर हा युवा लेखक आहे ज्याने स्वतः नुकतीच अजिंठा पब्लिकेशन ही संस्था सुरु केलीय. या संस्थेमार्फत प्रकाशित झालेलं गाडा हे पहिले पुस्तक आणि अक्षयचा पहिला कथासंग्रह. चौदा छोटेखानी कथा यात आहेत. नावावरूनच हा ग्रामीण पार्श्वभूमी असणारा कथासंग्रह आहे हे जाणवते आणि कथाविषयही तसेच आहेत. वाचताना गावजीवनाच्या भवतालात आढळणाऱ्या अनेक व्यक्तींची आठवण ताजी होते. ही सर्व माणसं आपल्या परिघातच असतात तरीही त्यांची नेमकी नोंद आपण घेतलेली नसते मात्र संवेदनशील मनाने आणि काहीशा तटस्थपणाने जेंव्हा आपण याकडे पाहू लागतो तेंव्हा त्यातले बारकावे दिसू लागतात. अक्षयपाशी ही संवेदनशीलता पुरेपूर आहे या कथांवरून सिद्ध होते. त्याच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेली ही सर्व माणसं जिती जागती आहेत, हाडामासाची आहेत त्यांची नावे बदलली आहेत काही स्थळेदेखील बदलली आहेत मात्र मूळ आशय कथाविषय तोच ठेवून लेखन केलेलं आहे. या माणसांची सुखदुःखे, यांचे स्वभाव, हेवेदावे आणि परात्मभाव या सगळयांचं एकसंध रेखाटन यात आहे, जोडीला कधी उत्कंठा वाढवणारा घटनाक्रम आहे तर कधी हेलावून टाकणारी संकटे आहेत तर कधी दुनियादारी शिकवणारे अनुभव आहेत तर कधी जीवनाचा नि खोटारडेपणाचा तिटकारा यावा असे प्रसंग आहेत.

यातील कथावकाश ग्रामीण भवतालाचे आहेत. पात्रे जी मते मांडत असतात ते लेखकाचे मत असते. लेखक दोन पात्रांत भांडण विसंवाद घडवून आणतो आणि त्यातून त्याचं म्हणणं मांडतो. कथेतून तो काही ठोकताळे व्यक्त करतो. बदलत्या गावजीवनावर भाष्य करतो. गावाकडल्या जुन्या नव्या पिढीचे काळेपांढरे चिठ्ठे खोलतो. गावजीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या शेती मातीवर, मुक्या जीवांवर, निसर्गावर, पीकपाण्यावर पात्रांच्या आडून भाष्य करतो तेंव्हा त्यातून त्याला संदेश द्यायचा असतो. गाडा ही शीर्षक कथातुकाराम या वृद्ध शेतकऱ्याची आहे, त्याच्या बैलजोडीने शर्यत जिंकावी हे त्याचं स्वप्न आहे आणि त्याचा वाहवत चाललेला मुलगा हे त्याचं दुखणं आहे. यातलं नाट्य देखणं आहे. ही कथा कसदार झालीय. ग्रामीण भागातील राजकारणाचे बारकावे 'आमदारकी...'च्या गोष्टीत आहेत. 'घुंगरू'मध्ये आयुष्यभर दळभद्री जीवन जगणाऱ्या खस्ता हाल असलेल्या रामशा थोरातला एके दिवशी घबाड हाती लागतं, त्याच्या मनात एक द्वंद्व साकारतं, अखेरीस तो त्यावर हात मारतो. अफाट श्रीमंत होतो मात्र अखेरीस विपरीत घडतं. अंधाराकडून उजेडाकडे आणि उजेडाकडून अंधाराकडे असा त्याचा प्रवास होतो. खेड्यापाड्यात प्रेमापायी वेड लागलेले जीव कमी दिसतात, अशा प्रेमवेड्या मुलीचं जीवन चितारताना अक्षयने त्याला गवसलेलं स्त्रीमन रेखाटलं आहे. सर्वच कथांचा काळ सद्य दशकातला आहे, अत्यंत जुने आठवणींचे कढ फारसे नाहीत तरीही या लेखनातून डोकावणारे ग्राम्यजगत जुनेर असेच आहे हे विशेष !

या सर्व कथा विशिष्ठ हेतू समोर ठेवून लिहिल्या आहेत हे जाणवते. काहीतरी लिहावंसं वाटणं ही बाब साहजिक आणि सामान्य आहे. मात्र आपल्याला काय लिहायचे आहे आणि का लिहायचे आहे याची उत्तरे लेखकास ठाऊक असली पाहिजेत. केवळ हौसेखातर कवितेच्या बुंदी पाडणारे, पानभर गद्य लिहिणारे खूप आढळतील, हरेकास लिहितं व्हावं वाटणं हे गैर नाहीच. उलट ज्या ज्या व्यक्तीस आपली अभिव्यक्ती शब्दबद्ध करावीशी वाटते त्यांनी ती अवश्य करावी. मात्र लिहिताना काही भान असणे जरुरीचे आहे. आपण का लिहितोय हे ज्याला ज्ञात असते त्या व्यक्तींनी आपलं प्रकटन अचूक व्हावं म्हणून प्रयत्नशील असलंच पाहिजे. याहीपुढे जाऊन आपलं लेखन अनेकांनी वाचलं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी तर या बाबतीत आग्रही असावं. आपली भूमिका व्यापक स्तरावर चर्चिली जावी, आपल्या लेखनावर मतमतांतरे मांडली जावीत असे ज्यास वाटते त्यांनी तर अधिक सजग असलं पाहिजे. अक्षय टेमकरला या गोष्टी चांगल्या उमजलेल्या आहेत.

काही कथांची शीर्षके अधिक नेमकी व प्रभावी ठेवता आली असती. वाक्यरचना आणि परिच्छेदांचा अवकाश यावर आणखी तपशीलात जाऊन विचार व्हावा. काही कथांच्या अंती वा मध्यास प्रबोधनप्र भाष्ये आलीत, ती टाळायला हवीत. वाचकांवर काही गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत. देवा झिंजाड यांची प्रस्तावना नीटस आहे, त्यात पुस्तकाचे नेमके सार आलेय. अन्वर हुसैन यांची रेखाचित्रे अप्रतिम जमलीत. त्याने कथाविषयास बळकटी लाभलीय. फारशी अलंकृत बोजड भाषा न वापरता ओघवत्या निवेदन शैलीत कथा समोर येतात. या कथा लिनिअर नॅरेटिव्हमधल्या फॉर्ममधल्या आहेत, त्यातला आकृतीबंध घोटीव आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणास आपल्या परिसरातील माणसांवर लिहावंसं वाटलं इतकाच याचा पैस नाही, अक्षयने स्वतःची प्रकाशन संस्था काढून इतरांची पुस्तकेही त्याद्वारे प्रकाशित करायचे ठरवलेय. त्याची साहित्यिक भूमिका आणि वैचारिक बैठक समृद्ध होवो. 'गाडा'साठी या तरुण मित्रास मनःपूर्वक शुभेच्छा.
__________________________________________